Join us

पीएनबी घोटाळ्यात एका विधी संस्थेचीही चौकशी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2018 11:52 PM

मोदीच्या कंपनीची कागदपत्रे विधी संस्थेला

मुंबई/नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बँकेतील (पीएनबी) १४ हजार कोटी रुपयांच्या घोटाळ््यात भारतातील सर्वांत मोठी कायदे संस्था (लॉ फर्म) ‘सिरिल अमरचंद मंगलदास’ची (कॅम) सीबीआयकडून चौकशी सुरू असल्याचे वृत्त आहे.सरकार आणि पोलिसांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या एका वकिलाने ही माहिती दिली. त्याने सांगितले की, या घोटाळ््यातील प्रमुख आरोपी नीरव मोदी याच्या एका हिरे कंपनीच्या मुंबईतील कार्यालयाजवळच कॅमचे कार्यालय आहे. फेब्रुवारीच्या मध्यास नीरव मोदीच्या साथीदारांनी या कंपनीची कागदपत्रे काही खोक्यांत भरून कॅमच्या कार्यालयात पाठविली होती. सीबीआयने २१ फेब्रुवारी रोजी ही कागदपत्रे जप्त केली होती. याच प्रकरणात आता या विधि संस्थेची चौकशी करण्यात येत आहे.सरकारी पक्षाचे वकील के. राघवाचारयुलु व सीबीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कॅमकडे नीरवचे वकीलपत्र नाही. तरीही या संस्थेकडे या प्रकरणाची कागदपत्रे सापडली आहेत. त्यामुळे वकील-पक्षकार मुद्याचा लाभ कॅमला घेता येणार नाही. या मुद्द्यावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यास कॅमने नकार दिला आहे. संस्थेच्या प्रवक्त्याने सांगितले की, आमची संस्था सर्वोत्तम कायदेशीर प्रथांचे पालन करते. न्यायालयाधीन अथवा तपास सुरू असलेल्या प्रकरणांवर आम्ही कोणत्याही प्रकारे प्रतिक्रिया देत नाही.आरोपी की साक्षीदार?याप्रकरणी दाखल पहिल्या आरोपपत्रात कॅमच्या कार्यालयातून कागदपत्रे जप्त केल्याचा उल्लेख केला होता. परंतु संस्थेला साक्षीदार करण्यात आले नव्हते.नंतर पोलिसांनी कॅमच्या एका वकिलाची चौकशीही केली. पण त्याचा जबाब अद्याप कोर्टात दिलेला नाही. कॅमवर पुरावे दडवण्याचा आरोप ठेवावा की साक्षीदारच ठेवावे यावर विचार सुरु आहे.

टॅग्स :पंजाब नॅशनल बँक घोटाळा