Join us  

पीएनबीच्या हाँगकाँग, दुबईच्या शाखांनीही दिली नीरवला कर्जे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2018 5:18 AM

नीरव मोदी याच्या कंपन्यांना पंजाब नॅशनल बँकेच्या मुंबईतील ब्रॅडी हाऊस शाखेनेच नव्हे, तर हाँगकाँग आणि दुबई येथील शाखांनीही कर्जे दिल्याची माहिती समोर आली आहे.

नवी दिल्ली : नीरव मोदी याच्या कंपन्यांना पंजाब नॅशनल बँकेच्या मुंबईतील ब्रॅडी हाऊस शाखेनेच नव्हे, तर हाँगकाँग आणि दुबई येथील शाखांनीही कर्जे दिल्याची माहिती समोर आली आहे.नीरव मोदी याने घडविलेल्या १४,000 कोटी रुपयांच्या महाघोटाळ्याची पीएनबीने अंतर्गत चौकशी केली. त्यासंबंधीचा एक अहवाल बँकेने तपास संस्थांना सादर केला आहे. त्यात ही माहिती देण्यात आली आहे. १६२ पानांच्या या अहवालात पुरावा म्हणून अंतर्गत ई-मेल जोडण्यात आले आहेत.अहवालात म्हटले आहे की, नीरव मोदीच्या फायरस्टार डायमंड लि., हाँगकाँग आणि फायरस्टार डायमंड लिमिटेड एफझेडई दुबई या कंपन्यांना पीएनबीच्या हाँगकाँग आणि दुबईच्या शाखांतून लेटर्स आॅफ के्रडिटच्या (एलओयू) माध्यमातून कर्जे देण्यात आली. तथापि, हाँगकाँग आणि दुबईच्या शाखांची ही कर्जे देताना काही घोटाळा झाल्याचा पुरावा उपलब्ध नाही. त्यामुळे या दोन्ही कर्ज खात्यांना घोटाळ्यात गृहीत धरण्यात आलेले नाही.नीरव मोदी याची अमेरिकेतील एक कंपनी फायरस्टार डायमंड आयएनसीने न्यूयॉर्कच्या दक्षिण दिवाळखोरी न्यायालयात कमल ११ अन्वये दिवाळखोरीसाठी अर्ज केला आहे. पीएनबी घोटाळा उघडकीस आल्यानंतर कंपनीने लगेचच दिवाळखोरीसाठी अर्ज दाखल केला होता. दिवाळखोरीच्या या खटल्यात पीएनबीनेही स्वत:ला सहभागी करून घेतले आहे. घोटाळ्यातील पैसा या कंपनीत वळविण्यात आल्याचा संशय असल्यामुळे पीएनबीने ही खबरदारी घेतली आहे.

टॅग्स :नीरव मोदी