मुंबई : गेल्या काही दिवसांत अर्थव्यवस्थेत सुधार दिसून आला असला तरी आणि विविध ग्राहक निर्देशांकातही सुधार दिसून आला असला, तरी येत्या ३० सप्टेंबर रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेतर्फे मांडल्या जाणाऱ्या पतधोरणात प्रमुख व्याजदर जैसे थे राहण्याचे संकेत मिळत आहेत. व्याजदर जरी स्थिर राहिले तरी गेल्या दोन पतधोरणाद्वारे रिझर्व्ह बँकेने ‘स्टॅट्युटरी लिक्विडिटी रेशो’मध्ये (एसएलआर) जशी कपात केली होती, तशीच कपात या वेळीही होऊ शकेल, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. एसएलआर म्हणजे ‘स्टॅट्युटरी लिक्विडिटी रेशो’. यानुसार सोन्याच्या रूपात अथवा त्या मूल्याचे सरकारी बॉन्ड खरेदी करणे बँकांसाठी सक्तीचे असते. गेल्या दोन पतधोरणांच्या माध्यमातून एसएलआरच्या दरात कपात केल्याने आतापर्यंत ६८ हजार कोटी रुपयांच्या आसपास रक्कम बँकांकडे उपलब्ध झाली किंवा ते पैसे मोकळे झाले. याचा वापर बँकांना आपले कर्ज ग्राहकांना अधिक स्वस्तात उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने करता आला. तशाच पद्धतीने या वेळीही जर एसएलआरमध्ये कपात झाली तर ३९ हजार कोटी रुपयांच्या आसपास निधी बँकांकडे उपलब्ध होतील. याचा परिणाम महागाई नियंत्रणात आणण्याच्या रूपाने दिसून आला आहे. तसेच चलनवाढही आटोक्यात येताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर तसेच आगामी काळात दसरा-दिवाळीचा सण लक्षात घेता रिझर्व्ह बँकेतर्फे व्याजदरात कपात होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. मात्र २०१६ पर्यंत चलनवाढीचा दर ६ टक्क्यांपर्यंत आणण्याच्या दृष्टीने तूर्तास तरी व्याजदर कपात शक्य नसल्याचे मत अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केले. (प्रतिनिधी)
धोरणात्मक व्याजदर ‘जैसे थे’ राहणार !
By admin | Published: September 29, 2014 7:37 AM