लातूर : देशात सर्वाधिक वेतन मिळविणाऱ्यांच्या यादीत चौथ्या क्रमांकावर तर ४० पेक्षा कमी वयोगटात प्रथम क्रमांकावर लातूरचे अभय सुरेशचंद्र भुतडा यांचं नाव झळकलं आहे. त्यांना आर्थिक वर्षे २०२३ मध्ये ७८.१ कोटी रुपये इतके वेतन मिळालंय.
३७ व्या वर्षीय अभय भुतडा यांनी आजवर पूनावाला फायनान्स प्रायव्हेट लिमिटेडचे सह-संस्थापक, व्यवस्थापकीय संचालक तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहिलं. सध्या ते पूनावाला फिनकॉर्प लिमिटेडचे कार्यकारी संचालक आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली कंपनीनं प्रथम वर्षातच नफा मिळवत केअर रेटिंग्स लिमिटेडकडून "ए ए प्लस" चे क्रेडिट रेटिंग मिळवलं. उद्योग व्यवसायाचे डिजिटलायझेशन, जोखीम व्यवस्थापन आणि कॉर्पोरेट गव्हर्नन्स, तसेच नवे व्यवसाय विकसित करण्याला अभय यांनी प्राधान्य दिलं. आरोग्य, शिक्षण क्षेत्रात सीएसआरद्वारे त्यांनी योगदान दिलंय.
उद्योग क्षेत्रातील योगदानासाठी अभय यांना अनेक पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलंय. ज्यामध्ये यंग एंटरप्रेन्योर ऑफ इंडिया २०१७, प्रॉमिसिंग एंटरप्रेन्योर ऑफ इंडिया २०१९, तसेच २०२०-२०२१ च्या प्रभावशाली लीडर पुरस्काराचा समावेश आहे.
नोकरी करत शिक्षण, उद्योगात भरारी...अभय भुतडा यांचे वडील सुरेशचंद्र भुतडा हे लातूरमध्ये किराणा व्यवसायातील मोठे व्यापारी आहेत. अभय यांची वाटचाल शालेय जीवनापासून गुणवत्तापूर्ण राहिली आहे. लातूरच्या व्यंकटेश विद्यालयात व राजर्षी शाहू महाविद्यालयात शिक्षण घेतल्यानंतर पुढील उच्च शिक्षण पुण्यात पूर्ण केले. ते सीए झाले. विशेष म्हणजे त्यांनी नोकरी करत उच्च शिक्षण पूर्ण केलं. वडील सुरेशचंद्र, आई सरोजादेवी, पत्नी तृप्ती,भाऊ विनय, आशुतोष तसेच चुलते लक्ष्मीरमण व रमेश भुतडा यांचा स्नेह आणि पाठबळ अभय यांच्यासाठी प्रेरणादायी राहिला आहे.