यंदाचा अर्थसंकल्प सादर होण्यास आता अवघे तीन दिवस शिल्लक राहिले आहे. सर्वसामान्यांसाठी काय वाढून ठेवलेले असेल, महागाई कमी करण्यासाठी कर वाढ की कराची मर्यादा वाढविणार आदी सर्व गोष्टींवर उहापोह सुरु असताना सरकारी कर्मचारी आनंदाने उड्या मारू लागतील अशी माहिती येत आहे.
सरकारी कर्मचारी अनेक दिवसांपासून 8 वा वेतन आयोग लागू करण्याची मागणी करत आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करताना 8 वा वेतन आयोग लागू करण्याची घोषणा करू शकतात, असे म्हटले जात आहे.
सध्या देशात सातवा वेतन आयोग सुरू आहे. सरकारने 8वा वेतन आयोग जाहीर केल्यास सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होणार आहे. तसे झाल्यास खालच्या स्तरापासून वरच्या स्तरापर्यंतच्या सरकारी अधिकाऱ्यांचे पगार वाढतील. यामुळे पर्यायाने महागाई देखील वाढणार आहे. सरकारचा खर्च वाढेल, त्यामुळे त्याचा फटका सर्वसामान्यांना कररुपी बसणार आहे.
कर्मचाऱ्यांना वेतन आयोग दर 10 वर्षांनी लागू केला जातो. हा प्रकार आतापर्यंत 5व्या, 6व्या आणि 7व्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीत दिसून आला आहे. 2023 मध्ये 8 वा वेतन आयोग स्थापन केला जाईल आणि त्याच्या शिफारशी 2026 मध्ये लागू केल्या जातील असा अंदाज कर्मचाऱ्यांनी पूर्वी व्यक्त केला होता.