Join us

सोन्यावरील जीएसटी ५ टक्के होण्याची शक्यता

By admin | Published: June 21, 2017 2:28 AM

सोन्यावरील वस्तू आणि सेवाकराचा (जीएसटी) दर सध्याच्या तीन टक्क्यांवरून पाच टक्के करण्याचा निर्णय जीएसटी

सोपान पांढरीपांडे । लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सोन्यावरील वस्तू आणि सेवाकराचा (जीएसटी) दर सध्याच्या तीन टक्क्यांवरून पाच टक्के करण्याचा निर्णय जीएसटी कौन्सिलच्या पहिल्या तिमाही बैठकीत घेतला जाऊ शकतो अशी माहिती अर्थ मंत्रालयाच्या सूत्रांनी दिली.सोन्यावरील जीएसटीचा दर पाच टक्के करण्याची मागणी केरळचे वित्तमंत्री थॉमस आयझॅक यांनी केली होती. केरळमध्ये सोन्याची खूप मोठी उलाढाल होत असते. याशिवाय सेंट्रल बोर्ड आॅफ सेंट्रल एक्साईज व कस्टमने (सीबीसीईसी) पण सोन्यावरील जीएसटीचा दर अधिक असावा, अशी शिफारस केली होती. सोने ही चैनीची वस्तू असल्याने तिच्यावर सवलतीच्या दराने कर आकारू नये असे सीबीसीईसीचे म्हणणे होते, अशी माहितीही या सूत्रांनी दिली.देशभरात सध्या सोन्यावर चार टक्क्याच्या आसपास कर आकारला जातो. महाराष्ट्रात ही कर आकारणी ४.२० टक्के आहे. यात प्रत्येकी एक टक्का केंद्रीय विक्रीकर, एलबीटी, एक्साईज ड्युटी व १.२० टक्के व्हॅटचा समावेश आहे. त्यामुळे सोन्याला जीएसटीच्या पाच टक्के श्रेणीत ठेवणे संयुक्तिक झाले असते. परंतु सराफ, सुवर्णकार यांनी एक टक्का कर असावा अशी मागणी केली होती म्हणून जीएसटी कौन्सिलने सोने तीन टक्क्याच्या सवलत दराच्या श्रेणीत ठेवले होते, असे सूत्रांनी सांगितले.दरवर्षी संपूर्ण जगात दरवर्षी १२०० ते १३०० टन सोन्याची उलाढाल होते व त्यापैकी ७५० ते ८०० टन उलाढाल एकट्या भारतात होते. गेल्यावर्षी सेंट्रल एक्साईज कर लादल्यामुळे व नोटाबंदीमुळे उलाढाल ६०० टनापर्यंत घसरली होती. आता २०१७-१८ मध्ये भारतात सोन्याची उलाढाल ६५० ते ७५० टनापर्यंत वाढेल, असा अंदाज वर्ल्ड गोल्ड कौन्सिलने वर्तवला.