नवी दिल्ली : गव्हाच्या आयातीवर अंकुश लावण्यासाठी सरकार गव्हावरील विद्यमान आयात कर १० टक्क्यांवरून वाढवून २५ टक्के करण्याची शक्यता आहे.सध्या देशात गव्हाचा मोठा साठा उपलब्ध आहे, त्यामुळे गव्हाची आयात रोखण्याची सरकारची इच्छा आहे. सरकारने गेल्या महिन्यात गव्हावर १० टक्के आयात कर लावला होता. २००६ नंतर प्रथमच गव्हावर आयात कर लावण्यात आलेला आहे. खासगी आटा कारखान्यांनी आॅस्ट्रेलियातून गव्हाची आयात सुरू केल्याने हा कर लावण्यात आला होता.पिझ्झा आणि तत्सम खाद्यपदार्थांसाठी अधिक प्रोटीन असलेला गहू लागतो. त्यामुळे आॅस्ट्रेलियातून अशा गव्हाची आयात केली जात आहे.भारतीय खाद्य महामंडळाजवळ (एफसीआय) दुसऱ्या जातीच्या गव्हाचा मोठा साठा असूनही कारखाने आॅस्ट्रेलियातून गव्हाची आयात करीत आहेत. एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, खाद्य मंत्रालयाने गव्हाच्या आयातीवरील कर १० टक्क्यांवरून २५ टक्के करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. त्यामुळे गव्हाची आयात घटून देशांतर्गत बाजाराला संरक्षण मिळेल. या मुद्यावर उद्या महसूल विभागासोबत चर्चा केली जाणार आहे.कृषी मंत्रालयही अशा करवाढीस अनुकूल आहे. पुढील महिन्यात नवीन पीक बाजारात येण्यास प्रारंभ होईल, त्यामुळे गव्हाची आयात चालूच राहिली तर स्थानिक बाजारातील गव्हाच्या किमतीवर विपरीत परिणाम होईल. एक अधिकारी म्हणाला की, भारतात अगोदरच पाच लाख टन गहू आॅस्ट्रेलियातून आला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत गव्हाच्या किमती घटल्या आहेत.
गव्हावरील आयात करात वाढ होण्याची शक्यता
By admin | Published: October 14, 2015 10:39 PM