मुंबई - ग्राहक वस्तूंपासून ते रिअल इस्टेटपर्यंत विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या गोदरेज उद्योग समूहाचा पालक असलेल्या गोदरेज परिवारात मतभेद निर्माण झाले आहेत. त्यामुळे या समूहाची पुनर्रचना होऊ शकते.
१२२ वर्षांचा इतिहास आणि ५ अब्ज डॉलरचे संचित असलेल्या गोदरेज समूहात चेअरमन आदी गोदरेज आणि त्यांचे बंधू नादीर गोदरेज हे एका बाजूला, तर त्यांची चुलत भावंडे जमशीद गोदरेज आणि स्मिता गोदरेज क्रिष्णा दुसऱ्या बाजूला, अशी विभागणी परिवारात झाली आहे. समूहाच्या पुढील वाटचालीची दिशा काय असावी, हा मतभेदाचा मुख्य मुद्दा असल्याचे समजते. मुंबईत समूहाच्या मालकीची १ हजार एकर जमीन असून, तिच्या विकासाच्या मुद्द्यावरून मतभेदाची ठिणगी पडली आहे.
सूत्रांनी सांगितले की, गोदरेज परिवारातील सदस्य आपल्या कायदेशीर सल्लागारांची मदत घेत असल्याचे समोर आल्याने मतभेदाला पुष्टी मिळते. प्राप्त माहितीनुसार, जमशीद गोदरेज हे गुंतवणूक बँकर निमेश कामपानी आणि वकील झिया मोदी यांचा सल्ला घेत आहेत. आदी गोदरेज हे कोटक महिंद्रा बँकेचे प्रमुख उदय कोटक आणि सिरील श्रॉफ कायदा सल्लागार संस्थेचे सिरील अमरचंद मंगलदास यांची मदत घेत आहेत. बँकर्स आणि वकील हे गोदरेज समूहात मध्यस्थाची भूमिका पार पाडत असल्याचे सूत्रांनी सांगितले.
गोदरेज समूहाच्या प्रवक्त्याने सांगितले की, आमच्यात वाद नसून, दीर्घकाळाची धोरणे ठरवण्यासाठी आम्ही बाहेरील सल्लागारांची मदत घेत आहोत. त्यामुळे अशा बातम्या आल्या आहेत. मात्र, गोदरेज परिवारातील संघर्ष केवळ व्यावसायिक ध्येय-धोरणांपुरताच मर्यादित असण्याची शक्यता नाही.
परिवार संघर्षाच्या कालखंडातून जात असला तरी बाहेर मात्र परिवाराचे सदस्य एकमेकांबाबत खेळीमेळीने वागताना दिसत आहेत. संचालक मंडळाच्या बैठकांत आजही पूर्वीसारखेच सौहार्दपूर्ण वातावरण असते.
गोदरेज परिवारातील मतभेदामुळे समूहाची पुनर्रचना होण्याची शक्यता
ग्राहक वस्तूंपासून ते रिअल इस्टेटपर्यंत विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या गोदरेज उद्योग समूहाचा पालक असलेल्या गोदरेज परिवारात मतभेद निर्माण झाले आहेत. त्यामुळे या समूहाची पुनर्रचना होऊ शकते.
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2019 03:52 AM2019-06-28T03:52:23+5:302019-06-28T03:53:08+5:30