Join us

तुम्ही Post Office ATM वापरता? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवायलाच हव्या, कोणतीही समस्या येणार नाही!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2023 2:24 PM

Post Office ATM Rules: तुम्ही इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेचे खातेधारक असाल, तर ATM कार्डविषयीच्या ५ गोष्टी माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे. जाणून घ्या...

Post Office ATM Rules: गेल्या अनेक दशकांपासून Post Office हे भारतीयांचे अढळ विश्वासाचे स्थान आहे. पोस्ट ऑफिसच्या अनेक योजना आताच्या घडीला उपलब्ध असून, कोट्यवधी देशवासी नानाविध योजनांचा लाभ घेत आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात पोस्ट ऑफिस अनेक प्रकारच्या सुविधा प्रदान करते. Post Office अजूनही गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम पर्याय मानला जातो. Post Office मध्ये तुमचे पैसेही सुरक्षित राहतात, यासोबतच तुम्हाला हमखास परतावाही मिळतो. ग्राहकांच्या सोयीसाठी पोस्ट ऑफिसने बँकही सुरू केली आहे. लाखो लोक पोस्ट ऑफिसच्या बँकेचा वापर करतात. मात्र, Post Office ATM वापरणाऱ्यांनी काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. 

 बँकांप्रमाणे इंडिया पोस्ट आपल्या बचत खातेधारकांना एटीएम कार्ड वापरण्याची परवानगी देते. ते वापरण्याची पद्धत बँकेच्या सामान्य एटीएम कार्डसारखीच आहे. जर तुम्ही इंडिया पोस्टमध्ये बचत खाते उघडले असेल आणि तुम्हाला त्याच्या एटीएम कार्ड सुविधेचा आनंद घ्यायचा असेल, तर पहिल्या व्यवहारावर जारी केलेल्या सर्व अटी आणि नियम माहिती असायला हवेत. 

इंडिया पोस्टच्या एटीएम कार्डवर मर्यादा किती?

बँक एटीएम कार्डप्रमाणेच सरकारने इंडिया पोस्टच्या एटीएम कार्डवरही मर्यादा निश्चित केली आहे. इंडिया पोस्टच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध माहितीनुसार, या एटीएम कार्डद्वारे एका दिवसात केवळ २५ हजार रुपये काढले जाऊ शकतात. तुम्ही एका वेळी फक्त १० हजार रुपये काढू शकता. जर तुम्हाला २५ हजार रुपये काढायचे असतील तर त्यासाठी तुम्हाला १० हजार रुपये दोनदा आणि एकदा ५ हजार रुपये काढावे लागतील.

किती व्यवहारांनंतर शुल्क भरावे लागणार? 

भारतीय पोस्ट एटीएमवर कोणतेही व्यवहार शुल्क आकारले जात नाही. मात्र, इतर बँकांच्या एटीएमवर त्याची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. तुम्ही मेट्रो शहरात राहत असाल तर तुम्ही इतर बँकेच्या एटीएममधून एका महिन्यात ३ मोफत व्यवहार करू शकता. तुम्ही मेट्रो नसलेल्या शहरात राहत असाल तर तुम्ही इतर एटीएममधून ५ मोफत व्यवहार करू शकता. ही मर्यादा संपल्यानंतर, तुमच्याकडून प्रति व्यवहार २० रुपये आणि GST आकारला जाईल.

ATM वर प्रतिवर्षी किती शुल्क घेण्यात येते?

तुम्हाला कोणत्याही कारणास्तव इंडिया पोस्ट ऑफिसचे एटीएम कार्ड बदलायचे असेल, तर तुम्हाला त्यासाठी ३०० रुपये आणि जीएसटी शुल्क भरावे लागेल. याशिवाय शाखेतून पिन जनरेट करण्यासाठी ५० रुपये अधिक जीएसटी शुल्क भरावे लागेल. पोस्ट ऑफिस एटीएम कार्डच्या सुविधेचा लाभ घेण्यासाठी, खातेधारकाला देखभाल शुल्क म्हणून वार्षिक १२५ रुपये आणि जीएसटी भरावा लागेल. याशिवाय, जर तुम्हाला एसएमएसद्वारे प्रत्येक व्यवहाराची माहिती मिळवायची असेल, तर त्यासाठी तुम्हाला वार्षिक १२ रुपये आणि जीएसटी शुल्क भरावे लागेल.

Post Office ATM कुणाला मिळत नाही?

भारतीय पोस्ट ऑफिसचे खातेधारक जे अल्पवयीन आहेत म्हणजेच जे १८ वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत. किंवा ज्यांचे संयुक्त खाते आहे. अशा खातेदारांना एटीएम कार्डची सुविधा देण्यात आलेली नाही. अशा खातेदारांना इंटरनेट बँकिंग सुविधाही उपलब्ध करून देण्यात आलेली नाही. याशिवाय, इंडिया पोस्टच्या एटीएम मशीनवर मोफत व्यवहाराची मर्यादा संपल्यानंतर तुम्हाला शुल्क भरावे लागेल. जर तुम्हाला आर्थिक व्यवहार (रोख पैसे काढणे) करायचे असतील तर तुम्हाला प्रत्येक व्यवहारासाठी १० रुपये आणि GST भरावा लागेल. आणि जर तुम्हाला नॉन फायनान्स ट्रान्झॅक्शन (बॅलन्स चौकशी किंवा पिन जनरेट) करायचे असतील तर तुम्हाला ८ रुपये आणि GST शुल्क भरावे लागेल.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :पोस्ट ऑफिसएटीएम