नवी दिल्ली: देशभरात भारतीय पोस्ट ऑफिसचे जाळे मोठ्या प्रमाणात पसरलेले आहे. पोस्टाच्या एकापेक्षा एक उत्तम योजना असून, यातून ग्राहकांना तसेच गुंतवणूकदारांना चांगला लाभ मिळू शकतो. देशातील सर्वांत विश्वासार्ह गुंतवणुकीतील एक पर्याय म्हणून Post Office च्या योजनांकडे पाहिले जाते. हमखास रिटर्न, सुरक्षा, हमी यांमुळे पोस्ट ऑफिस व्यवहारावर हजारो देशवासी विश्वास ठेवतात. गेल्या अनेक दशकांपासून पोस्ट ऑफिस आपली अविरत सेवा देत आहे. काही वर्षांपूर्वी पोस्ट ऑफिसला बँकिंग व्यवहार सुरू करण्याचा परवाना मिळाला होता. ग्राहकांनी यालाही प्रचंड प्रतिसाद दिला. यातच आता १ एप्रिलपासून पोस्टाचा एक नियम बदलत असल्याची माहिती मिळाली आहे.
पोस्ट विभागाने एका परिपत्रकात म्हटले आहे की पोस्ट ऑफिस १ एप्रिल २०२२ पासून ज्येष्ठ नागरिक बचत योजना, मासिक उत्पन्न योजना आणि मुदत ठेव खात्यांवर रोख व्याज देणे बंद करतील. व्याज फक्त खातेदाराच्या पोस्ट ऑफिस बचत खात्यात किंवा बँक खात्यात जमा केले जाईल. काही ज्येष्ठ नागरिक बचत योजना, मासिक उत्पन्न योजना आणि मुदत ठेव खातेधारकांनी त्यांचे बचत खाते (पोस्ट ऑफिस बचत खाते किंवा बँक खाते) त्यांच्या मासिक/त्रैमासिक/वार्षिक व्याजाच्या क्रेडिटसाठी लिंक केलेले नाही. अशा परिस्थितीत त्यावर देय असलेले व्याज अदा राहील.
थकबाकीचे व्याज पोस्ट ऑफिस बचत खात्यात
पोस्ट ऑफिसने आपल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की, कोणत्याही कारणास्तव खातेधारक त्यांचे बचत खाते ज्येष्ठ नागरिक बचत योजना, मासिक उत्पन्न योजना आणि मुदत ठेव खात्यांशी जोडू शकत नसतील, तर थकबाकीचे व्याज पोस्ट ऑफिस बचत खात्यात किंवा धनादेशाद्वारे जमा केले जाईल. पोस्ट ऑफिस बचत बँक ऑपरेशन्सवर चांगले नियंत्रण, डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन, मनी लाँडरिंग क्रियाकलापांना प्रतिबंध आणि फसवणूक टाळण्यासाठी, सक्षम प्राधिकरणाने नागरिक बचत योजना, मासिक उत्पन्न योजना आणि मुदत ठेव सुरू केली आहे.
बँक खाते अनिवार्यपणे लिंक करण्याचा निर्णय
खात्यांवरील व्याज भरण्यासाठी पोस्ट ऑफिस बचत खाते किंवा बँक खाते अनिवार्यपणे लिंक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ज्येष्ठ नागरिक बचत योजना, मासिक उत्पन्न योजना आणि मुदत ठेव खात्यांच्या अनर्जित व्याजावर कोणतेही व्याज दिले जात नाही. परंतु व्याज, बचत खात्यात जमा केल्यास, अतिरिक्त व्याज मिळेल. अशा परिस्थितीत, टपाल विभागाने लोकांना त्यांचे बचत खाते (एकतर पोस्ट ऑफिस बचत खाते किंवा बँक खाते) व्याज भरण्यासाठी लिंक करण्याचे आवाहन केले आहे.