नवी दिल्ली : पोस्ट ऑफिसमध्ये बचत खाते असणाऱ्यांसाठी पोस्ट खात्याने महत्वाचा दिलासा दिला आहे. पोस्टामध्ये 25 हजारांपेक्षा अधिकची रक्कम भरण्यासाठी क्लिष्ट अट ठेवलेली होती. ग्राहकांच्या तक्रारीनंतर पोस्टाने सोईसाठी हा नियमच बदलला आहे.
पोस्टामध्ये खातेधारकांना नॉन होम ब्रांच म्हणजेच स्थानिक शाखेशिवाय अन्य शाखेत पीपीएफ, आरडी किंवा सुकन्य़ा समृद्धी खात्यांमध्ये 25 हजारांपेक्षा जास्त रक्कम भरता येत नव्हती. याची तक्रार अनेक ग्राहकांनी केली होती. तसेच चेकही जमा करता येत नव्हता. यामुळे ग्राहकांना त्रास होत होता. या तक्रारींवरून पोस्ट खात्याने हा नियमच बदलला आहे. नव्या नियमानुसार कोणत्याही शाखेमध्ये 25 हजार किंवा त्याहून जास्त रक्कम, चेक भरता येणार आहेत.
यासाठी आधीचा नियम बदलला आहे. याचबरोबर बचत खाते, आरडी, पीपीएफ किंवा सुकन्या समृद्धी योजनेंतर्गत कोअर बँकिंगद्वारे 25 हजारांपेक्षा जास्तीचा चेक कोणत्याही ब्रँचमध्ये भरता येणार आहे. मात्र, अन्य कोणत्या पोस्टाच्या शाखेतून पैसे काढायचे असतील तर जास्तीत जास्त 25 हजार रुपयेच काढता येणार आहेत आणि यासाठी चेक द्यावा लागणार आहे.
या नव्या नियमांचा फायदा जुन्या व नव्या ग्राहकांना होणार आहे. जर कोणी नोकरीनिमित्त बाहेरगावी असेल तर त्याला हा फायदा होणार आहे. या क्लिष्ट नियमांचा पोस्ट खात्यालाही फटका बसत होता. या नियमामुळे योजनांचे हप्ते खकत होते. किंवा कोणाला बचत करायची असेल तर ते पैसे डिपॉझिट होत नसल्याने नुकसानही होत होते.