Join us  

Post Office : पोस्ट ऑफिसने 'या' योजनांसाठी सुरू केली ऑनलाइन सर्व्हिस; आता तुम्ही घरबसल्या घेऊ शकता लाभ! 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 03, 2022 3:48 PM

Post Office : पोस्ट ऑफिसने किसान विकास पत्र (KVP), राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (NSC) सारख्या योजनांसाठी ऑनलाइन सेवा सुरू केली आहे.

नवी दिल्ली : आजच्या वेगवान डिजिटल युगात ऑनलाइनचा कल झपाट्याने वाढला आहे. त्यामुळे आता अनेक पॉलिसी ऑनलाईन मिळतात. अशा परिस्थितीत आता कोणत्याही सरकारी कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागणार नाहीत. दरम्यान, पोस्ट ऑफिसने किसान विकास पत्र (KVP), राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (NSC) सारख्या योजनांसाठी ऑनलाइन सेवा सुरू केली आहे.

पोस्ट ऑफिसने 18 ऑगस्ट 2022 रोजी एक अधिसूचना जारी केली होती. त्यानुसार इंटरनेट बँकिंगसाठी नोंदणी केलेले पोस्ट ऑफिस ग्राहक आता NSC आणि KVP ऑनलाइन ओपन करू शकतात आणि बंद करू शकतात. आता तुम्ही घरी बसूनही या योजनांचा लाभ घेऊ शकता. यासाठी तुमच्याकडे इंटरनेट कनेक्शन असणे आवश्यक आहे.

या सुविधेचा लाभ घेण्यासाठी इंटरनेट बँकिंग आवश्यक आहे. NSC किंवा KVP खाते उघडण्यापूर्वी एखाद्या व्यक्तीला डिपार्टमेंट ऑफ पोस्ट (DOP) इंटरनेट बँकिंगची सुविधा घ्यावी लागते. पोस्ट विभागाचे (डीओपी) इंटरनेट बँकिंग वापरणारे खातेदार NSC आणि KVP खाती घरी बसून उघडू शकतात. या सुविधेअंतर्गत खाते उघडण्यासाठी किंवा बंद करण्यासाठी, सर्व्हिस रिक्वेस्ट ऑफ जनरल सर्व्हिसेस या ऑप्शनवर जावे लागेल. यानंतर NSC आणि KVP खात्याचा ऑप्शन येईल. त्यानंतर KVP खाते किंवा NSC खाते उघडण्यासाठी NSC खाते आणि KVP खात्यावर क्लिक करा.  

काय आहे राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र?राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र ही कर बचतीची गुंतवणूक आहे, जी कोणत्याही पोस्ट ऑफिसमधून खरेदी केली जाऊ शकते. या योजनेला भारत सरकारचा पाठिंबा आहे, त्यामुळे परतावा आणि कमी जोखीम याची खात्री दिली आहे. हेच कारण आहे की, ज्या गुंतवणूकदारांना गुंतवणुकीत जोखीम नको आहे, त्यांना ते खूप आवडते. राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र योजनेत किमान 1000 रुपयांची गुंतवणूक करता येते. यामध्ये गुंतवणुकीची कमाल मर्यादा नाही. यात परताव्याची हमी मिळते.

काय आहे किसान विकास पत्र?किसान विकास पत्र (KVP) ही भारत सरकारद्वारे प्रदान केलेली बचत योजना आहे. KVP योजना उच्च व्याजदरांद्वारे म्यॅच्युरिटी कालावधी पूर्ण केल्यावर भरीव परतावा देते. भारत सरकारची ही जोखीममुक्त गुंतवणूक योजना आपल्या नागरिकांना दीर्घकालीन बचत करण्यास प्रोत्साहित करते. 18 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचा कोणताही नागरिक किसान विकास पत्रामध्ये गुंतवणूक करू शकतो. यामध्ये किमान गुंतवणूक रक्कम 1000 रुपये आहे आणि कमाल गुंतवणुकीसाठी कोणतीही मर्यादा निश्चित केलेली नाही.

टॅग्स :पोस्ट ऑफिसगुंतवणूकपैसा