Join us  

Post Office की SBI? ‘या’ FD मधील गुंतवणुकीतून मिळेल मोठा फायदा; जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2022 2:17 PM

पोस्ट ऑफिस किंवा एसबीआय यापैकी कुठे गुंतवणूक केल्यास त्याचा उत्तम परतावा मिळू शकतो, ते जाणून घ्या...

नवी दिल्ली: आपल्याकडे गुंतवणुकीसाठी अनेकविध पर्याय उपलब्ध आहेत. मात्र, गेल्या अनेक दशकांपासून विश्वासार्ह आणि हमखास उत्तम परतावा देणाऱ्या वित्तीय संस्था म्हणून पोस्ट ऑफिस आणि भारतीय स्टेट बँकेकडे पाहिले जाते. अलीकडेच खासगीसह सार्वजनिक बँकांनी मुदत ठेवींवर देण्यात येणाऱ्या व्याजांमध्ये वाढ केली आहे. मात्र, पोस्ट ऑफिस किंवा एसबीआय यापैकी कुठे गुंतवणूक केल्यास त्याचा उत्तम परतावा मिळू शकतो, ते जाणून घेऊया...

पोस्ट ऑफिस मुदत ठेव योजना या बँक एफडी सारख्याच असतात. पोस्ट ऑफिस एक वर्ष ते पाच वर्षांच्या कालावधीसाठी मुदत ठेवी देतात. बँक एफडीप्रमाणे पोस्ट ऑफिस मुदत ठेवींच्या कालावधीत गुंतवणूकदारांना हमी परतावा मिळू शकतो. तीन वर्षांच्या मुदत ठेवीसाठी ५.५ टक्के व्याज दर देते. पाच वर्षांच्या मुदत ठेव खात्यासाठी पोस्ट ऑफिस ६.७ टक्के व्याजदर देते.

पोस्ट ऑफिसचे व्याजदर कसे आहेत?

पोस्ट ऑफिस १ वर्षाच्या मुदत ठेव गुंतवणुकीवर ५.५ टक्के, २ वर्षांच्या गुंतवणुकीवर ५.५ टक्के आणि ३ वर्षांच्या गुंतवणुकीवर ५.५ टक्के व्याज देतात. तसेच एखादा नागरिक ५ वर्षांसाठी गुंतवणूक करतो, तेव्हा त्याला ६.७ टक्के पर्यंत परतावा मिळतो.

स्टेट बँकेची योजनेच वेगळेपण काय?

७ दिवस ते १० वर्षांच्या एसबीआय एफडीवर सामान्य ग्राहकांना २.९ टक्के ते ५.५ टक्के पर्यंत ऑफर करते. ज्येष्ठ नागरिकांना या ठेवींवर ३.४ टक्के ते ६.३० टक्के पर्यंत अतिरिक्त ५० बेसिस पॉइंट्स (bps) मिळतात. हे दर १५ फेब्रुवारी २०२२ पासून लागू केले आहेत. सामान्य ग्राहकांना ७ दिवसांपासून ४५ दिवसांपर्यंतच्या गुंतवणुकीवर २.९ टक्के परतावा दिला जातो. ४६ दिवसांपासून ते १७९ दिवसांच्या गुंतवणुकीवर ३.९ टक्के परतावा मिळतो. १८० दिवसांपासून २१० दिवसांपर्यंतच्या गुंतवणुकीवर ४.४ टक्के परतावा आहे. तर २११ दिवसांपासून ते १ वर्षापेक्षा कमी कालावधीच्या गुंतवणुकीवर ४.४ टक्के परतावा दिला जातो.

दरम्यान, १ ते २ वर्षांपेक्षा कमी गुंतवणुकीवर ५.१ टक्के, २ वर्ष ते ३ वर्षांपेक्षा कमी गुंतवणुकीवर ५.२ टक्के, ३ वर्ष ते ५ वर्षांपेक्षा कमी गुंतवणुकीवर ५.४५ टक्के आणि ५ वर्षे ते १० वर्षांपर्यंतच्या गुंतवणुकीवर ५.५ टक्के व्याज दिले जाते. एफडीमधील गुंतवणुकीला आयकर कलम ८०सी अंतर्गत ग्राहकांना सूट देण्यात आली आहे. 

टॅग्स :गुंतवणूकएसबीआयपोस्ट ऑफिस