Join us

पिनकोडची ५० वर्षे पूर्ण, मराठमोळ्या व्यक्तीशी निगडीत आहे ६ अंकांच्या पिनकोडची कहाणी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2022 6:38 PM

वाचा कशी झाली पिनकोडची सुरूवात आणि काय पिनकोडच्या त्या सहा अंकांमागचं रहस्य. जाणून घ्या कोण होत्या त्या मराठमोळ्या व्यक्ती ज्यांनी यात मोलाचं योगदानही दिलं.

देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असतानाच पिन कोड म्हणजेच पोस्टल आयडेंटिफिकेशन नंबरनेही ५० वर्षे पूर्ण केली आहेत. १५ ऑगस्ट १९७२ रोजी भारतात पिन कोडची सुरूवात. त्याच्या सुरुवातीचा इतिहासही रंजक आहे. टपाल विभागाच्या म्हणण्यानुसार, देशात अशी अनेक ठिकाणे होती ज्यांची नावे सारखीच होती. त्यामुळे पत्रे, कागदपत्रे व इतर गोष्टी पोहोचवणे कठीण होत होते. हा संभ्रम दूर करण्यासाठी आणि वस्तू सहज पोहोचवण्यासाठी पिनकोड प्रणाली लागू करण्यात आली. पिनकोड प्रणाली विकसित करण्याचे श्रेय संस्कृत कवी आणि केंद्रात कार्यरत असलेले श्रीराम भिकाजी वेलणकर यांना जाते. पिनकोड म्हणजे काय, ६ अंकी पिनकोडचा अर्थ काय असेल आणि त्याची सुरुवात कशी झाली हे आपण जाणून घेऊया.

देशात आपण ६ अंकी पिन कोडचा वापर करतो. पहिल्या क्रमांकाचा अर्थ राज्याची दिशा सांगतो. दुसरा अंक झोन दर्शवतो. तिसरा अंक जिल्ह्याची माहिती देतो. त्याच वेळी, चौथा, पाचवा आणि सहावा अंक पोस्ट ऑफिस जिथे आहे त्या पोस्ट ऑफिसची भौगोलिक स्थिती सांगतात. पिनकोडद्वारे पत्रे आणि वस्तू पोस्ट ऑफिस किंवा कुरिअर एजन्सीला पोहोचवल्या जातात. येथून हे सर्व त्याच्या पत्त्यावर पाठवले जाते.

देशातील ९ भौगोलिक क्षेत्रांना पिनकोड देण्यात आले आहेत. यामध्ये आर्मी पोस्टल सर्व्हिससाठी एक पॉइंट राखून ठेवण्यात आला आहे. पोस्ट खात्यानुसार, देशात एकूण १९१०१ पिन अलॉट करण्यात आलेले आहेत. त्यांच्या मदतीनं त्यांचं स्थान जाणून घेता येऊ शकतं. ते तयार करून देशभरात लागू करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागली होती.

असा तयार झाला पिनकोडदेशात पिनकोड लागू करण्याची कल्पना श्रीराम भिकाजी वेलणकर यांची होती. त्यावेळी ते दळणवळण मंत्रालयात अतिरिक्त सचिव म्हणून कार्यरत होते आणि टेलिग्राफ बोर्डाचे वरिष्ठ सदस्यही होते. तेव्हा देशात वस्तू पोहोचवण्यासाठी अशा पद्धतीची गरज होती जी प्रत्येक राज्यात सहज राबवता येईल. अशा परिस्थितीत वेलणकर यांनी पिनकोडच्या माध्यमातून अशी यंत्रणा तयार केली, ज्यामुळे देशात कुठेही वस्तू पोहोचवणे सोपे झाले. पिनकोडच्या माध्यमातून स्थानाबद्दल बरेच काही सांगितलं आणि समजलंही जाऊ लागलं. जीपीएसच्या जमान्यातही पिनकोडचे महत्त्व कमी झालेले नाही.

श्रीराम भिकाजी वेलणकर हे सुप्रसिद्ध संस्कृत कवीही होते. त्यांनी संस्कृतमध्ये १०५ पुस्तके लिहिली आणि त्यांचे 'विलोमा काव्य' हे नाटक आजही संस्कृत साहित्याचा उत्कृष्ट नमुना म्हटले जाते. आपल्या कार्यकाळात त्यांचे मोलाचे योगदान होते. ३१ डिसेंबर १९७३ रोजी ते निवृत्त झाले. त्यांच्या या कामगिरीबद्दल त्यांना अनेक पुरस्कारांनीही सन्मानित करण्यात आले आहे.

टॅग्स :पोस्ट ऑफिसस्वातंत्र्य दिनभारत