Join us  

बँक एफडी सोडा, आता पोस्ट ऑफिस देतंय शानदार व्याज; 7 टक्क्यांच्या जवळपास रिटर्न, सुरक्षिततेची पूर्ण हमी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2023 10:13 AM

लहान बचत योजनांतर्गत, पोस्ट ऑफिसमध्ये दोन वर्षांच्या एफडीवर 6.9 टक्के व्याज मिळत आहे, जे बहुतेक बँकांना त्याच कालावधीच्या एफडीवर मिळणाऱ्या रिटर्नपेक्षा जास्त आहे.

नवी दिल्ली : लहान बचत योजनांवरील व्याजदर सलग तीन वेळा वाढल्यामुळे पोस्ट ऑफिसची एफडी आता बँक एफडीच्या (Post Office FD vs Bank FD) तुलनेत उभी राहिली आहे. लहान बचत योजनांतर्गत, पोस्ट ऑफिसमध्ये दोन वर्षांच्या एफडीवर 6.9 टक्के व्याज मिळत आहे, जे बहुतेक बँकांना त्याच कालावधीच्या एफडीवर मिळणाऱ्या रिटर्नपेक्षा जास्त आहे. यामागील महत्त्वाचे कारण म्हणजे रिझर्व्ह बँकेने रेपो दरात केलेली वाढ आहे. 

बँकांनी अधिक पैसे जमा करण्यासाठी ठेवींवर अधिक व्याज देण्यास सुरुवात केली. परिणामी, मे 2022 ते फेब्रुवारी 2023 दरम्यान बँकांच्या नवीन ठेवींवरील सरासरी देशांतर्गत एफडीवरील दर (WADTDR) 2.22 टक्क्यांनी वाढला. जिथे 2022-23 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत बँकांचा भर घाऊक ठेवींवर जास्त होता, तर दुसऱ्या सहामाहीत त्यांचे प्राधान्य बदलले आणि त्यांनी किरकोळ ठेवी वाढवण्याकडे अधिक लक्ष दिले. व्याजदरात झालेली वाढ हा त्याचाच एक भाग होता. विशेष म्हणजे या काळात बँकांनी कर्जावरील व्याजातही सातत्याने वाढ केली.

सरकारने लहान बचत योजनांसाठी (SSI) ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीसाठी 0.1-0.3 टक्के, जानेवारी-मार्च तिमाहीसाठी 0.2-1.1 टक्के आणि एप्रिल-जून 2023 तिमाहीसाठी 0.1-0.7 टक्के व्याजदर वाढवले ​​आहेत. याआधी, सलग नऊ तिमाहीत लहान बचत योजनांवरील व्याजदरात कोणताही बदल झालेला नाही. आर्थिक वर्ष 2020-21 च्या दुसऱ्या तिमाहीपासून 2022-23 च्या दुसऱ्या तिमाहीपर्यंत यामध्ये कोणतीही वाढ झालेली नाही.

बँकांचे एफडी दर आता पोस्ट ऑफिस एफडी दरांशी स्पर्धा करत आहेत, असे रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे. रिझर्व्ह बँकेच्या मते, एक ते दोन वर्षांच्या मुदतीच्या बँक एफडीवर 2023 मध्ये सरासरी व्याज 6.9 टक्के असणार आहे. सप्टेंबर 2022 मध्ये तो 5.8 टक्के होता. छोट्या बचत योजनांवरील व्याजदर सलग तीन वेळा वाढवल्यानंतर 2 वर्षांच्या पोस्ट ऑफिस एफडीवर आता 6.9 टक्के रिटर्न मिळत आहे. सप्टेंबर 2022 मध्ये हा दर 5.5 टक्के होता. देशातील सर्वात मोठी बँक एसबीआय एक वर्षापेक्षा जास्त आणि दोन वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या ठेवींवर 6.8 टक्के व्याज देत आहे.

टॅग्स :पोस्ट ऑफिसगुंतवणूकपैसाबँक