नवी दिल्ली : भविष्य सुरक्षित बनवण्यासाठी सध्याच्या काळात बचत करणे गरजेचे आहे. कारण, चांगल्या किंवा वाईटप्रसंगी सर्वात महत्त्वाची बचत ठरते. कठीण प्रसंगातून बाहेर पडण्यासाठी बचतीतले पैसे वापरता येतात. अशा सुरक्षित आणि जोखीममुक्त बचतीसाठी पोस्टाच्या चांगल्या योजना आहेत. पोस्टाची अशीच एक योजना आहे, ज्याद्वारे तुम्ही दररोज फक्त 95 रुपये जमा केल्यास 15 वर्षांनंतर तुम्हाला कमीत-कमी 14 लाख रुपये मिळतील.
ग्राम सुमंगल ग्रामीण पोस्ट जीवन विमा
ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांना बचत करणे खूप अवघड असते. कारण छोट्या खेड्यामध्ये बँकांचे प्रमाण खूप कमी असते. अनेक लहान गावांमध्ये बँका नसतात. जवळच्या मोठ्या गावात बँक असते. अशा परिस्थितीत भारतीय पोस्ट ऑफिसने (Indian Post Office) ग्राम सुमंगल ग्रामीण टपाल जीवन विमा योजना (Gram Sumangal Post Life Insurance Scheme) सुरू केली आहे. यामध्ये दररोज फक्त 95 रुपये जमा करून तुम्ही मुदतीअंती 14 लाख रुपयांपर्यंतची रक्कम मिळवू शकता. याशिवाय मनीबॅकचा लाभही घेता येतो. त्यामुळे जितकी रक्कम गुंतवली आहे ती सगळी परत मिळते.
या योजनेत मॅच्युरिटी बोनस मिळेल
पोस्ट ऑफिसच्या ग्राम सुमंगल योजनेत पॉलिसीधारकाला मॅच्युरिटी बोनसही (Maturity Bonus) मिळेल. या योजनेत तुम्ही 15 वर्षं आणि 20 वर्षं अशा दोन कालावधीसाठी पैसे जमा करू शकता. या योजनेचा लाभ घेण्यासाठी गुंतवणूकदाराचे किमान वय 19 वर्षं आणि जास्तीत जास्त 45 वर्षं असले पाहिजे.
ग्राम सुमंगल योजनेचे फायदे
या योजनेत मनीबॅक (Money Back) सुविधा सुद्धा उपलब्ध आहे. यामध्ये पॉलिसीधारकास 10 लाखांपर्यंतची विमा रक्कम मिळते. पॉलिसीची मुदत पूर्ण होईपर्यंत म्हणजेच म्यॅच्योर होईपर्यंत एखादी व्यक्ती जिवंत राहिली तर त्याला मनी बॅकचा फायदा होतो. मनी बॅकचा तीन वेळा हा लाभ मिळतो. या अंतर्गत 15 वर्षांच्या पॉलिसीमध्ये सहा वर्षं, नऊ वर्षं आणि 12 वर्षं पूर्ण झाल्यावर 20-20 टक्के रक्कम परत मिळते. मुदतपूर्तीनंतर बोनससह उर्वरित 40 टक्के रक्कमदेखील दिली जाते.
इतका भरावा लागेल हप्ता
जर एखादी व्यक्ती 25 वर्षांची असेल तर सात लाख रुपयांच्या रकमेसाठी 20 वर्षांच्या मुदतीकरिता दरमहा 2853 रुपयांचा हप्ता भरावा लागेल. म्हणजेच दररोज सुमारे 95 रुपयांची बचत करावी लागेल. वार्षिक प्रीमियम 32 हजार 735 रुपये असेल. सहा महिन्यांसाठी तो 16 हजार 715 रुपये आणि तीन महिन्यांसाठी 8 हजार 449 रुपयांचा हप्ता भरावा लागेल.