Join us

गुंतवणुकीचा दुप्पट परतावा हवाय? Post Office ने आणलीय पैसे डबल करणारी योजना; पटापट चेक करा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2022 1:13 PM

Post Office च्या अनेक लोकप्रिय योजनांपैकी एक असलेल्या या भन्नाट योजनेचा सविस्तर तपशील जाणून घ्या...

मुंबई: गेल्या अनेक दशकांपासून Post Office हे भारतीयांचे अढळ विश्वासाचे स्थान आहे. पोस्ट ऑफिसच्या अनेक योजना आताच्या घडीला उपलब्ध असून, कोट्यवधी देशवासी नानाविध योजनांचा लाभ घेत आहे. काही वर्षांपूर्वी सुरू करण्यात आलेल्या पोस्ट ऑफिस बँकेलाही देशवासीयांचा उदंड प्रतिसाद मिळाला आहे. यातच पोस्ट ऑफिसची अशी एक योजना आहे, ज्याचा तुम्हाला भरघोस लाभ होऊ शकतो. अशीच एक पोस्ट ऑफिस स्कीम आहे, ज्यामध्ये गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळतो. 

पोस्ट ऑफिसच्या या योजनेचे नाव किसान विकास पत्र (Kisan Vikas Patra) आहे. या योजनेतून गुंतवलेल्या रमकेवर काही कालावधीनंतर दुप्पट परतावा मिळू शकतो. पोस्ट ऑफिसची ही योजना अनेक लोकप्रिय योजनांमध्ये वरच्या क्रमांकावर असल्याचे सांगितले जाते. सध्या पोस्ट ऑफिसमधून किसान विकास पत्रातील गुंतवणुकीवर ६.९ टक्के दराने व्याज उपलब्ध आहे. 

किसान विकास पत्रातील गुंतवणुकीचे प्रमाणपत्र

तुम्हाला किसान विकास पत्रामध्ये गुंतवणूक करायची असेल तर त्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जावे लागेल. तेथे, ठेव पावतीसह अर्ज भरावा. त्यानंतर गुंतवणूकीची रक्कम रोख, चेक, डिमांड ड्राफ्ट किंवा पे ऑर्डरद्वारे जमा करावी. या अर्जासोबत ओळखपत्राची छायाप्रत जोडणे आवश्यक आहे. अर्ज आणि गुंतवणूक रक्कम जमा केल्यानंतर, तुम्हाला किसान विकास पत्रातील गुंतवणुकीचे प्रमाणपत्र मिळेल.

किसान विकास पत्र योजनेद्वारे कर्जही घेऊ शकता

तुम्ही किसान विकास पत्रामध्ये ५० हजारांपेक्षा जास्त गुंतवणूक केल्यास तुम्हाला पॅन कार्डचे तपशील शेअर करावे लागतील. या योजनेद्वारे तुम्ही कर्ज घेऊ शकता. तुम्ही हमी म्हणून किसान विकास पत्र वापरू शकता. किसान विकास पत्र योजनेचा परिपक्वता कालावधी १२४ महिन्यांचा आहे. जर कोणी ही योजना खरेदी केल्यानंतर एका वर्षाच्या आत परत केली तर त्याला कोणत्याही प्रकारच्या व्याजाचा लाभ मिळणार नाही. पोस्ट ऑफिसची ही योजना आयकर कायदा ८० सी अंतर्गत येत नाही. यामुळे गुंतवणुकीच्या रकमेवर तुम्हाला जो काही परतावा मिळेल, त्यावर तुम्हाला कर भरावा लागेल. मात्र, या योजनेत टीडीएस कापला जात नाही.

किती वर्षांत पैसे होणार डबल?

पोस्ट ऑफिसच्या किसान विकास पत्र योजनेत १८ वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचा कोणताही नागरिक या योजनेत गुंतवणूक करू शकतो. किसान विकास पत्रामध्ये किमान गुंतवणूक रक्कम रु १००० आहे. जास्तीत जास्त गुंतवणुकीसाठी कोणतीही मर्यादा निश्चित केलेली नाही. पोस्ट ऑफिसनुसार, किसान विकास पत्रातील तुमची गुंतवणूक रक्कम १२४ महिन्यात म्हणजे १० वर्षे ४ महिन्यांत दुप्पट होते. 

टॅग्स :पोस्ट ऑफिसगुंतवणूक