Join us  

Post Office ची भन्नाट योजना! घरबसल्या दरमहा ४९५० रुपये कमवा; फक्त ‘इतके’ गुंतवा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2022 2:27 PM

Post Office कोणत्या योजनेत कितीची गुंतवणूक करायची? पाहा, या योजनेची वैशिष्ट्ये आणि आवश्यक कागदपत्रे.

नवी दिल्ली: गेल्या अनेक दशकांपासून Post Office हे भारतीयांचे अढळ विश्वासाचे स्थान आहे. पोस्ट ऑफिसच्या अनेक योजना आताच्या घडीला उपलब्ध असून, कोट्यवधी देशवासी नानाविध योजनांचा लाभ घेत आहे. काही वर्षांपूर्वी सुरू करण्यात आलेल्या पोस्ट ऑफिस बँकेलाही देशवासीयांचा उदंड प्रतिसाद मिळाला आहे. यातच पोस्ट ऑफिसची अशी एक योजना आहे, ज्याचा तुम्हाला भरघोस लाभ होऊ शकतो, तसेच या योजनेत गुंतवणूक केल्यास दर महिन्याला तुम्ही ४९५० रुपये कमावू शकता. 

जर तुम्हाला जोखीम न घेता फायदा आणि बचत हवी असेल तर तुमच्यासाठी मासिक उत्पन्न योजना आहे. या योजनेअंतर्गत, तुम्हाला एकदा पैसे गुंतवावे लागतील आणि योजनेच्या मुदतीनंतर, तुम्हाला उत्पन्न म्हणून दरमहा एक निश्चित रक्कम मिळेल. म्हणजेच या योजनेत गुंतवणूक करून तुम्हाला दरमहा ४९५० चे उत्पन्न मिळू शकते.

पोस्टाची योजना शेअर मार्केटवर अवलंबून नाही

पोस्ट ऑफिसच्या या योजनेवर शेअर बाजारातील चढ-उतारांचा गुंतवणुकीवर किंवा परताव्यावर परिणाम होत नाही. या योजनेचा मॅच्युरिटी कालावधी ५ वर्षे आहे. पोस्ट ऑफिसच्या या मासिक उत्पन्न योजनेत कोणताही भारतीय नागरिक गुंतवणूक करू शकतो. केवळ एक हजार रुपये गुंतवून तुम्ही मासिक योजना सुरू करू शकता. याअंतर्गत येणारे खाते एकट्याने आणि संयुक्तपणे उघडता येते. एका खात्यात कमाल गुंतवणूक ४.५ लाख रुपये आहे, तर संयुक्त खात्यात कमाल ९ लाख रुपये गुंतवू शकता. MIS चे व्याज दरमहा दिले जाते. या योजनेचा व्याज दर सध्या वार्षिक ६.६ टक्के आहे.

कसे मिळतील दरमहा ४९५० रुपये?

योजनेच्या नियमांनुसार, एक वर्ष ते तीन वर्षांच्या दरम्यान पैसे काढल्यास, ठेव रकमेच्या २ टक्के कापली जाईल. दुसरीकडे, खाते उघडल्यानंतर ३ वर्षांच्या मुदतीपूर्वी तुम्ही पैसे काढले, तर तुमच्या ठेवीपैकी १ टक्के रक्कम वजा केल्यावर परत केली जाईल. या योजनेनुसार, तुम्हाला एका खात्यात २९,७०० रुपये वार्षिक व्याज मिळेल. म्हणजेच दरमहा २,४७५ रुपये व्याज मिळणार आहे. त्याच वेळी, संयुक्त खात्यात वार्षिक ५९,४०० रुपये व्याज उपलब्ध होईल. म्हणजेच दरमहा ४९५० रुपये व्याज मिळेल. अशा प्रकारे तुम्ही दरमहा ४९५० रुपये कमवू शकता.

खाते उघडण्यासाठी काय काय हवे?

- पोस्टाच्या मासिक उत्पन्न योजना खाते उघडण्यासाठी, तुमच्याकडे आधार कार्ड किंवा पासपोर्ट किंवा मतदार कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स असणे आवश्यक आहे.

- यासोबतच २ पासपोर्ट आकाराचे फोटोही आवश्यक असतील.

- तुम्हाला तुमच्या नॉमिनीचे नावही लागेल.

- तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन मासिक उत्पन्न योजनेचा फॉर्म भरून खाते उघडू शकता. अथवा ऑनलाइन फॉर्मदेखील डाउनलोड करू शकता. 

टॅग्स :पोस्ट ऑफिसगुंतवणूक