नवी दिल्ली- पोस्टाच्या छोट्या छोट्या योजनांमध्ये गुंतवणूक केल्यावरही चांगला फायदा मिळतो. या योजनांमध्ये गुंतवणूक केल्यानंतर फक्त सरकारी सुरक्षाच नव्हे, तर चांगला परतावाही मिळतो. विशेष म्हणजे या योजनांमध्ये गुंतवलेल्या पैशांवर आपल्याला करातही सूट मिळते. प्राप्तिकर कायद्याच्या कलम 80सीनुसार 1.5 लाखांपर्यंतच्या गुंतवणुकीवर सूट मिळते. या बचत योजनांच्या माध्यमातून आपली करातूनही सुटका होऊ शकते. पोस्ट ऑफिसमधील योजनांवरील व्याजदरही सरकार ठरवत असून, त्यात तिमाहीच्या आधारावर वाढ होत असते.
- पोस्टाची मुदत ठेव(FD)- पोस्टात आपण चार प्रकारे पैसे गुंतवू शकतो. वर्ष, दोन वर्षं, तीन वर्षं आणि पाच वर्षांसाठी गुंतवणूक करता येते. वर्षातील मुदत ठेवीवर 6.6 टक्के व्याज मिळतं, तर दोन वर्षांच्या मुदत ठेवींवर 6.7 टक्के व्याज दिलं जातं. तीन वर्षीय पोस्टाच्या ठेवींवर 6.9 टक्के व्याज प्राप्त होतं. तर पाच वर्षांसाठी ठेवलेल्या रकमेवर 7.4 टक्के एवढं व्याज मिळतं. याच गुंतवणुकीवर आपल्याला नव्या व्याजदरानुसार फायदा मिळणार आहे. विशेष म्हणजे पाच वर्षांसाठी ठेवलेल्या या रकमेवर प्राप्तिकर कायद्यातील कलम 80 सीअंतर्गत सूटही दिली जाते. त्यामुळे या पैशांवर कोणताही कर लागू होत नाही.
- 15 वर्षीय सार्वजनिक भविष्य निधी खातं(पीपीएफ)- पीपीएफचं खातं आपल्याला 100 रुपयांमध्ये उघडता येते. यातील जमा रकमेवर 8 टक्के व्याज दिलं जातं. खातेधारकांना आपल्या खात्यात 500 रुपये आणि जास्तीत जास्त करून 1.50 लाख रुपये जमा करावे लागतात. तसेच खात्याची मर्यादा 15 वर्षांसाठी असते. यात आपण संयुक्त खातंही उघडू शकतो. आपल्याला या योजनेत नॉमिनेशनची सुविधाही प्राप्त होते. यात एका वित्त वर्षात तुम्हाला एक लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर चांगला फायदा मिळतो.
- वरिष्ठ नागरिक बचत खाते(एससीएसएस): 60 वर्षं वयाची व्यक्तीही या योजनेत खातं उघडू शकते. 55 ते 60 वर्षं वयाच्या व्यक्ती निवृत्तीच्या तीन महिने आधीही या योजनेत खातं खोलून पैसे गुंतवू शकतात. खातं उघडल्यानंतर आपल्याला कमीत कमी 1000 रुपये जमा ठेवावे लागतात. या खात्यात तुम्ही जास्तीत जास्त 15 लाख रुपये साठवून ठेवू शकता. ज्यावर तुम्हाला वर्षाला 8.7 टक्के व्याज मिळते. या योजनेची मर्यादा पाच वर्षांची असते. डिसेंबर 2018च्या तिमाहीत वरिष्ठ नागरिक बचत योजनेत तुम्हाला प्रतिवर्ष 8.7 टक्के व्याज मिळत होते. वरिष्ठ नागरिक बचत योजनेवर व्याज 31 मार्च/30 सप्टेंबर/ 31 डिसेंबरला जमा करण्याच्या तारखेपासून लागू होते. त्यानंतर 31 मार्च, 30 जून, 30 सप्टेंबर, 31 डिसेंबरपर्यंत जमा रकमेवर व्याज मिळणार आहे. डिसेंबरमध्ये समाप्त होणा-या तिमाहीसाठी पीपीएफमध्ये जमा असलेल्या रकमेवर प्रतिवर्षी 8 टक्के व्याज मिळत होते. आता त्यात 0.10 टक्क्यांची वाढ झाली आहे. दरवर्षी 6000 रुपयांची बचत केल्यास 15 वर्षांनी मुदत संपल्यावर 1.7 लाख रुपये तुम्हाला मिळू शकतात. खात्रीशीर व्याज देणारा आणि पीपीएफच्या सुरक्षित पर्यायाचा विचार केला पाहिजे. जितक्या लवकर बचत सुरू करता येईल तितका चांगला फायदा मिळेल.
- नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट(एनएससी): नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट योजनेत डिसेंबरला संपणा-या तिमाहीसाठी 8.0 टक्क्यांनी व्याज मिळत होते. या योजनेंतर्गत तुम्ही 100 रुपये गुंतवू शकता. पहिल्यांदा या योजनेत गुंतवणूक करणा-याला वर्षाला 7.6 टक्के व्याज मिळत होते. आता त्याच्याच वाढ झाली आहे.