Join us

Post Office मध्ये तुमचे खाते आहे? ३१ मार्चपर्यंत करा ‘हे’ काम; नाहीतर बंद होईल अकाऊंट!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 05, 2022 1:10 PM

एक महत्त्वाचे काम ३१ मार्च २०२२ पर्यंत पूर्ण करणे आवश्यक आहे. नाहीतर तुमचे खाते बंद केले जाऊ शकते.

नवी दिल्ली: देशभरात भारतीय पोस्ट ऑफिसचे (Post Office) जाळे मोठ्या प्रमाणात पसरलेले आहे. पोस्टाच्या एकापेक्षा एक उत्तम योजना असून, यातून ग्राहकांना तसेच गुंतवणूकदारांना चांगला लाभ मिळू शकतो. मात्र, गुंवतणूक करताना योग्य माहिती घेतल्यास जबरदस्त रिटर्न्स मिळू शकतात, असे सांगितले जाते. पोस्ट ऑफिसमध्ये हजारो देशवासीयांची बचत खात्यासह विविध प्रकारचे अकाऊंट्स आहेत. मात्र, ३१ मार्च २०२२ पर्यंत एक महत्त्वाचे काम केले नाही, तर अकाऊंट बंद होऊ शकतो, असे म्हटले जात आहे. 

बचत आणि आयकरातून सूट मिळविण्यासाठी सरकारच्या अनेक योजना आहेत. सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (पीपीएफ), राष्ट्रीय पेन्शन योजना (एनपीएस) आणि सुकन्या समृद्धी योजना (एसएसवाय) यांचा समावेश होतो. या सर्व योजना लघु बचत योजना आहेत आणि वार्षिक आधारावर बचत केल्यास प्राप्तिकरातही सूट मिळते. तुम्हीही यापैकी कोणत्याही योजनेत गुंतवणूक केली असेल, तर तुम्ही एक काम ३१ मार्च २०२२ पर्यंत पूर्ण करणे आवश्यक आहे. नाहीतर तुमचे खाते बंद केले जाईल. त्यानंतर हे खाते पुन्हा सुरू करण्यासाठी तुम्हाला दंडासह आवश्यक कागदपत्रे द्यावी लागतील, असे सांगितले जात आहे.

१० टक्क्यांपर्यंत कर कपातीचा दावा

लघु बचत योजना खात्यांमध्ये दरवर्षी किमान शिल्लक रक्कम जमा करावी लागते. जर तुम्ही आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये किमान शिल्लक जमा केली नसेल, तर तुम्ही खाते बंद करू शकता. सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीमध्ये वार्षिक आधारावर जास्तीत जास्त १.५ लाख रुपये गुंतवू शकतात. ज्या रकमेवर तुम्हाला आयकरातून सूट मिळते. राष्ट्रीय पेन्शन योजनेत गुंतवणुकीची कमाल मर्यादा नाही. या योजनेअंतर्गत, आयकर कायद्याच्या कलम ८० सीसीडी (१) अंतर्गत, एखादी व्यक्ती सकल उत्पन्नाच्या १० टक्क्यांपर्यंत कर कपातीचा दावा करू शकते.

वर्षाला दीड लाख रुपयांपर्यंतची रक्कम जमा करता येते

सुकन्या समृद्धी योजनेत मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी वर्षाला दीड लाख रुपयांपर्यंतची रक्कम जमा करता येते. या योजनेत केलेली गुंतवणूक आयकर कलम ८० सी अंतर्गत करमुक्त आहे. मात्र, सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीमध्ये किमान वार्षिक ५०० रुपये जमा करणे आवश्यक आहे. यासोबतच राष्ट्रीय पेन्शन योजनेत वार्षिक आधारावर किमान १००० रुपये जमा करावे लागतील, असे न केल्यास १०० रुपये दंड भरावा लागेल. दुसरीकडे, सुकन्या समृद्धी योजनेत आर्थिक वर्षात २५० रुपये जमा करावे लागतात, असे न केल्यास ५० रुपये दंड होऊ शकतो.

दरम्यान, या तिन्ही योजनांमध्ये, आर्थिक वर्षात किमान शिल्लक जमा न केल्यास ही खाती बंद केली जातात. ही खाती पुन्हा सुरू करण्यासाठी दंड भरावा लागेल, तसेच केवायसीसह इतर अनेक कागदपत्रे सादर करावी लागतील. त्यामुळे तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास टाळायचा असेल, तर तुम्ही ३१ मार्च २०२२ पर्यंत किमान शिल्लक जमा करणे आवश्यक आहे. 

टॅग्स :पोस्ट ऑफिस