नवी दिल्ली : कोरोना महामारी आणि रशिया-युक्रेन युद्धामुळे शेअर बाजारातील जोखीम कायम आहे. शेअर बाजारात कमालीची घसरण होत आहे. अशा परिस्थितीत, लोक आजकाल सुरक्षित गुंतवणुकीचे पर्याय शोधत आहेत. रिझर्व्ह बँकेच्या रेपो रेटमध्ये वाढ (Reserve Bank Repo Rate Hike) झाल्यानंतर बहुतांश मोठ्या सरकारी आणि खासगी बँकांनी आपल्या एफडी आणि बचत खात्यावरील व्याजदरात वाढ केली आहे, मात्र तरीही लोकांना तेवढा परतावा मिळत नाही. अशा परिस्थितीत गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम आणि सुरक्षित पर्याय म्हणजे पोस्ट ऑफिस.
पोस्ट ऑफिस मुदत ठेव योजना (Post Office Term Deposit Scheme) म्हणून ओळखली जाणारी पोस्ट ऑफिस एफडी योजना ग्राहकांना चांगला परतावा देण्यास मदत करते. तुम्ही या योजनेत 1, 2, 3 आणि 5 वर्षांपर्यंत वेगवेगळ्या कालावधीसाठी गुंतवणूक करू शकता. या सर्व कालावधीत तुम्हाला वेगवेगळे जास्त व्याजदर दिले जातात.
योजनेवर इतका मिळतो व्याजदारएक वर्षाचा कालावधी- 5.5%दोनवर्षांचा कालावधी- 5.5%तीन वर्षांचा कालावधी- 5.5%पाच वर्षांचा कालावधी- 6.7%
पोस्ट ऑफिसच्या मुदत ठेव योजनेसाठी पात्रता योजनेत गुंतवणूक करण्यासाठी तुमचे वय किमान 18 वर्षे असणे आवश्यक आहे, परंतु 10 वर्षांपेक्षा जास्त वयाची मुले पालकाच्या देखरेखीखाली खाते उघडू शकतात. तुम्हाला हे खाते किमान 1,000 रुपयांच्या गुंतवणुकीसह उघडावे लागेल आणि कमाल गुंतवणुकीची मर्यादा नाही.
गुंतवणुकीवर कर सूट गुंतवणूक केल्यावर, तुम्हाला आयकर कलम (Income Tax Rebate) 80C अंतर्गत सूट मिळते. अशा परिस्थितीत तुम्हाला या योजनेअंतर्गत 1.5 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर कर सूट मिळते. याच्या मदतीने तुम्ही एकापेक्षा जास्त मुदत ठेव खाते उघडू शकता. या योजनेंतर्गत खाते उघडल्यानंतर तुम्ही किमान 6 महिने पैसे काढू शकत नाही. यानंतर, 1 वर्षापूर्वी पैसे काढल्यास एकूण ठेव रकमेपैकी 2 टक्के कपात केली जाते.
5 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर इतका मिळेल परतावापोस्ट ऑफिसच्या 5 वर्षांच्या योजनेत तुम्ही 5 लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला 6.7 टक्के परतावा मिळेल. हा परतावा तिमाही आधारावर जोडला जाईल आणि तुम्हाला 5 वर्षांनंतर 5 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर 6.97 म्हणजेच 7 लाख रुपयांचा परतावा मिळेल.