Post Office: भारतीय डाक घर अर्थात पोस्ट ऑफीसच्या योजना सुरक्षित आणि सर्वाधिक खात्रीदायक म्हणून ओळखल्या जातात. त्यामुळे जास्त काळासाठी तुम्ही जर गुंतवणूक करण्याच्या विचारात असाल तर पोस्टाच्या योजनेचा जरूर विचार करायला हवा. पोस्टाची टाइम डिपॉझिट स्कीम अतिशय फायदेशीर ठरू शकते. यात तुम्ही गुंतवलेली रक्कम दुप्पट होण्यापर्यंतचा फायदा तुम्ही मिळवू शकता. या योजनेत १ ते ५ वर्षांपर्यंत तुम्ही गुंतवणूक करू शकता. सद्या या योजनेत वार्षिक ६.७ टक्के व्याज दिलं जात आहे. पोस्टाच्या या योजनेत तुम्ही नक्की कशी आणि किती गुंतवणूक करू शकता याची माहिती जाणून घेऊयात...
फक्त १ हजार रुपयांमध्ये सुरू करू शकता
पोस्ट ऑफिसच्या या योजनेत तुम्हाला बँकेच्या मुदत ठेवीवर मिळणाऱ्या व्याजापेक्षाही अधिक व्याज मिळतं. यात कमीत कमी १ हजार रुपयांची गुंतवणूक तुम्ही करू शकता. तर कमाल मर्यादा यात नाही. तुम्ही १ हजारापेक्षा अधिक हवी तितकी रक्कम गुंतवू शकता. गुंतवणुकीची रक्कम पूर्ण भरल्यानंतर तुम्हाला परतावा मिळणार याची पोस्ट ऑफीसकडून गॅरंटी दिली जाते. सिंगल किंवा जॉइंट अशा दोन्ही पद्धतीनं तुम्ही यात खातं उघडू शकता.
योजनेचे फायदे
१. योजनेत ५ वर्षांच्या गुंतवणूक केल्या गेलेल्या रकमेवर आयकर विभागाच्या १९६१ च्या कायद्यानुसार 80C अंतर्गत सूट देखील मिळते.
२. आपत्कालीन परिस्थितीत मुदत ठेव पूर्ण होण्याआधीच तुम्ही रक्कम परत काढू शकता. पण यासाठी तुमचं खातं सुरू करून किमान ६ महिने पूर्ण होणं आवश्यक आहे.
३. खातं सुरू करताना किंवा सुरू केल्यानंतर नॉमिनेशनची देखील सुविधा आहे.
४. जर तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीवर वार्षिक पद्धतीनं व्याज घेण्यासाठी पोस्ट ऑफीसमध्ये जायचं नसेल तर तुम्ही तुमचं व्याज पोस्ट ऑफीसमधील खात्यावर वळवू शकता.
कसा होईल फायदा?
जमा रक्कम: ५ लाख
व्याज दर: ६.७ टक्के वार्षिक व्याजदर
मुदत: ५ वर्ष
मुदत पूर्ण झाल्यावर मिळणारी रक्कम: ६,९१,५०० रुपये
एकूण होणारा फायदा: १,९१,५०० रुपये