सणासुदीला सुरुवात होणार आहे, महागाईने अनेकांचे कंबरडे मोडलेले आहे. अशातच सामान्यांना दिलासा देणारी बातमी येत आहे. बटाटा आणि तांदळाच्या किंमतीत घसरण होण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या आठ दिवसांत बटाट्याचे दर ८ टक्क्यांनी कमी झाले आहेत. बटाट्याचा साठा मोठ्या प्रमाणावर झाला असून सरकारने उलटे सुटले निर्णय घेतले नाहीत तर येत्या काळात हे दर आणखी घसरण्याची शक्यता आहे.
बटाट्याचे वाढते दर काबूत ठेवण्यासाठी पश्चिम बंगाल सरकारने निर्यातीवर बंदी आणली होती. उत्तर प्रदेशहून इतर राज्यांमध्ये जाणाऱ्या बटाट्यावर बंदी आणण्यात आली होती. यामुळे उत्तर प्रदेश आणि बंगालच्या कोल्ड स्टोरेजमध्ये बटाट्याचा साठा वाढला आहे. यामुळे दर घसरण्यास सुरुवात झाली आहे.
येत्या काळात बाजारात पुरवठा वाढणार आहे. कोल्ड स्टोरेजमधील बटाटा येत्या नोव्हेंबरपासून वापरला जाणार आहे. बटाट्याचा साठा वाढल्याने ममता बॅनर्जी यांनी त्याच्या आंतरराष्ट्रीय व्यापारास मान्यता दिली होती. जवळपास ८० लाख टन बटाटा कोल्ड स्टोरेजमध्ये पडून आहे. महाराष्ट्र, छत्तीसगढ़ मध्ये बटाट्याचे उत्पादन काढले जाणार आहे. यापूर्वीच हा साठा संपविण्याचे आव्हान सरकारसमोर आहे.
यंदा खरिपाचे पीक चांगले येण्याची शक्यता असल्याने भाताचे भावही घसरायला लागले आहेत. गेल्या तीन महिन्यांत किरकोळ स्तरावर बासमती तांदळाची किंमत ७५ रुपये किलोवरून ६० रुपये किलोपर्यंत घसरली आहे. बासमती तांदळाची भारताची किमान निर्यात किंमत $950 प्रति टन आहे. त्याहून कमी किंमतीत इतर देश तांदूळ विकत आहेत. यामुळे भारताला देखील दर कमी करावे लागणार आहेत.