PPF Saving Scheme Tips: आताच्या घडीला गुंतवणुकीसाठी विविध प्रकारच्या योजना आहेत. शेअर मार्केट, म्युच्युअल फंड, यासह विविध सरकारी योजनांच्या माध्यमातून आपण गुंतवणूक करून कोट्यवधींचा परतावा मिळवू शकतो. पोस्ट ऑफिस, एलआयसी, विविध सरकारी किंवा खासगी बँकेतील गुंतवणूकही फायदेशीर ठरू शकते. तुम्हाला अशा एका सरकारी योजनाबाबत माहिती देणार आहोत, ज्यामध्ये तुम्ही नियोजन पद्धतीने गुंतवणूक केल्यास कोट्यवधी रुपयांचा परतावा प्राप्त करू शकाल.
पैसा कमवायचा असेल तर तुमच्याकडे संयम असणे आवश्यक आहे. भविष्यात तुम्हाला भरपूर पैसे हवे असतील तर तुम्हाला तुमचे पैसे आधी कुठेतरी गुंतवावे लागतील. केवळ गुंतवणुकीतून तुम्हाला चांगला नफा मिळू शकतो आणि तुमचे भांडवल वाढू शकते. यासाठी तुम्ही कोणत्याही सरकारी योजनेत पैसे गुंतवू शकता, जमीन किंवा मालमत्ता खरेदी करू शकता किंवा बाजारातही गुंतवणूक करू शकता. सर्वसामान्यांसाठी बचतीच्या हेतूने सरकारकडून अनेक लहान बचत योजना राबविल्या जातात. या लोकप्रिय योजनांपैकी एक म्हणजे सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी म्हणजेच PPF. सरकारची ही योजना जोखीममुक्त असून उच्च परतावा देते, ज्यामध्ये गुंतवणूकदारांना खात्रीशीर परतावा मिळतो.
PPF गुंतवणुकीतून कसा मिळवाल कोट्यवधींचा परतावा?
या योजनेचा एक मोठा फायदा म्हणजे यामध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला कर लाभ मिळतो. या योजनेत तुम्ही वार्षिक १.५ लाख दराने गुंतवणूक करू शकता आणि त्यावर आयकर कपातीचा दावा करू शकता. एवढेच नाही तर पीपीएफ ठेवींवर मिळणारे व्याज आणि मॅच्युरिटी रकमेवर कोणताही कर भरावा लागत नाही. पीपीएफ खात्याचा परिपक्वता (मॅच्युरिटी) कालावधी १५ वर्षाचा आहे. एखादा गुंतवणूकदार त्याच्या पीपीएफ खात्याची मुदत पाच वर्षासाठी कोणतेही पैसे काढल्याशिवाय वाढवू शकतो. तीन वेळा पीपीएफ खाते विस्तारित करता येऊ शकेल. जेव्हा पीपीएफ खाते विस्तारित करत असाल, तेव्हा तुम्ही नवीन गुंतवणूक पर्यायांसह विस्तार केला पाहिजे. यासह, तुम्हाला पीपीएफ मॅच्युरिटी रक्कम आणि नवीन गुंतवणूक या दोन्हीवर व्याज मिळेल. जर एखाद्या व्यक्तीने असे केले तर सेवानिवृत्तीच्या वेळी तो त्याच्या पीपीएफ खात्यात एक कोटीहून अधिक रक्कम जमा करू शकतो.
३० वर्षांमध्ये गुंतवणूकदाराची गुंतवणूक कोट्यवधी होईल
एखाद्या व्यक्तीने वयाच्या ३० व्या वर्षी पीपीएफ खाते उघडले आणि त्याचा ५-५ वर्षाच्या अंतराचा तीन वेळा खाते विस्तार केला तर ती व्यक्ती ३० वर्षांसाठी पीपीएफ खात्यात गुंतवणूक करू शकेल. एखाद्या गुंतवणूकदाराने पीपीएफ खात्यात दरवर्षी दीड लाखाची गुंतवणूक केली तर ३० वर्षांच्या गुंतवणुकीनंतरची परिपक्वता रक्कम अंदाजे १.५४ कोटी रुपये होईल. सध्या पीपीएफवर ७.१ टक्के दराने व्याज मिळते. अशा स्थितीत PPF कॅल्क्युलेटरनुसार ३० वर्षांमध्ये गुंतवणूकदाराची गुंतवणूक केवळ रु. ४५ लाख होते. तसेच ७.१ टक्के व्याजानुसार, यावर १,०९,५०,९११ रुपये व्याज मिळू शकेल.
दरम्यान, एखादा गुंतवणूकदार कोणत्याही बँकेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये १०० रुपये जमा करून पीपीएफ खाते उघडू शकतात. मात्र PPF खात्यात दरवर्षी किमान ५०० रुपये जमा करणे आवश्यक आहे. पीपीएफ खात्याचा लॉक-इन कालावधी १५ वर्षांचा असेल, ज्यामध्ये कमावणारी व्यक्ती एका आर्थिक वर्षात दीड लाख रुपये जमा करू शकते.
(टीप - या लेखात केवळ शेअरची / गुंतवणूकीसंदर्भात माहिती देण्यात आली आहे. कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील तज्ज्ञांचा आणि जाणकारांचा सल्ला घ्यावा.)
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"