नवी दिल्ली : केंद्रातील मोदी (Modi Government) सरकार देशातील करोडो अल्प उत्पन्न गटातील लोकांसाठी अनेक योजना आणत आहे. एक काळ असा होता जेव्हा फक्त मध्यम आणि उच्च उत्पन्न गटातील लोकच विमा पॉलिसी (Insurance Policy) घेऊ शकत होते, परंतु सरकारच्या या योजनेद्वारे गरीब लोक देखील सामाजिक सुरक्षेचा लाभ घेऊ शकतात. आज आपण ज्या विमा पॉलिसीबद्दल बोलत आहोत, ती म्हणजे प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (Pradhan Mantri Suraksha Bima Yojana). या पॉलिसीद्वारे तुम्ही फक्त वार्षिक 20 रुपये खर्च करून 2 लाख रुपयांचे कव्हर मिळवू शकता.
पॉलिसीधारकाला मिळतो अपघाती विमा
प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेच्या (PM Suraksha Bima Yojana) माध्यमातून पॉलिसीधारकाला 2 लाख रुपयांच्या अपघाती विम्याचा (Accidental Insurance) लाभ मिळतो. पॉलिसीधारकाचा अपघाती मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला 2 लाख रुपये दिले जातात. दुसरीकडे, जर पॉलिसीधारक अपघातात अपंग झाला तर त्याला 1 लाख रुपयांचे विमा संरक्षण मिळते.
'हे' लोक खरेदी करून शकतात विमा पॉलिसी
दरम्यान, ही विमा पॉलिसी (PMSBY Scheme Benefits) खरेदी करण्यासाठी तुमचे वय 18 ते 70 वर्षांच्या दरम्यान असावे. ही पॉलिसी खरेदी केल्यानंतर, ती 1 जून ते 31 मे पर्यंत वैध राहते. यानंतर तुमच्या खात्यातून ऑटो डेबिट म्हणून 20 रुपये कापले जातील. यानंतर पुढील वर्षासाठी पॉलिसी ऑटो रिन्यू केली जाईल. यापूर्वी, या पॉलिसीसाठी लोकांना 12 रुपये वार्षिक प्रीमियम भरावा लागत होता, जो जून 2022 मध्ये वाढवून 20 रुपये करण्यात आला आहे.
अशाप्रकारे नॉमिनी क्लेम करु शकतील पॉलिसी
जर एखाद्या व्यक्तीचा अपघाती मृत्यू झाला असेल, तर पॉलिसीचा नॉमिनी बँकेत जाऊन पॉलिसीसाठी क्लेम करू शकतो. यासाठी त्याला मृत व्यक्तीचे डेथ सर्टिफिकेट, पोस्टमॉर्टम रिपोर्ट, आधार कार्ड, स्वत:चे आधार कार्ड बँकेत जमा करावे लागेल. अपंगत्व आल्यास पॉलिसीधारकाची हॉस्पिटलची कागदपत्रे, आधार कार्ड बँकेत जमा करावे लागतील. अपघातानंतर 30 दिवसांच्या आत तुम्ही पॉलिसीचा क्लेम करू शकता.