नवी दिल्ली - स्टील किंग लक्ष्मी मित्तल यांचे धाकटे भाऊ प्रमोद मित्तल यांनी आपल्या मुलीच्या लग्नात सुमारे ४८५ कोटी रुपये खर्च केले. मात्र सध्या ते ब्रिटनमधील सर्वात मोठे दिवाळखोर झाले आहेत. त्यांच्यावर जवळजवळ २५४ कोटी पौंड कर्ज आहे आणि ते आपल्या पत्नीच्या खर्चावर जगत आहेत असा दावा प्रमोद मित्तल यांनी केला आहे.
लंडनच्या इन्सॉल्वेंसी अँड कंपनी कोर्टाने ६४ वर्षांच्या मित्तल यांना दिवाळखोर घोषित केलं आहे. ते म्हणतात की त्यांच्यावर एकूण २५४ कोटी पौंड (सुमारे २५ हजार कोटी रुपये) चं कर्ज आहे. यात १७ कोटी पौंडचे कर्जदेखील आहे, जे त्यांनी त्यांच्या ९४ वर्षीय वडिलांकडून घेतलं होतं. त्याचप्रमाणे त्यांनी पत्नी संगीताकडून ११ लाख पौंड, मुलगा दिव्यांशकडून २४ लाख पौंड आणि नातेवाईक अमित लोहियाकडून ११ लाख पौंड कर्ज घेतले आहे.
ते म्हणतात की, आता त्यांच्याकडे केवळ १.१० लाख संपत्ती शिल्लक आहे आणि त्यांचे कोणतेही उत्पन्न नाही. मित्तल आपल्या कर्जदारांना अगदी छोटासा हिस्सा देण्यात तयार आहेत. लवकरच या दिवाळखोरीच्या समस्येवर तोडगा मिळेल अशी आशा त्यांना आहे. डायरेक्ट इनव्हेस्टमेंट लिमिटेड या ब्रिटीश व्हर्जिन आयलँड कंपनीकडून त्यांनी सर्वात जास्त १०० कोटी पौंड कर्ज घेतलं आहे
मुलीचं अलिशान लग्न
प्रमोद मित्तल यांनी २०१३ मध्ये मुलगी सृष्टीचे गुलराज बहल या गुंतवणूक बँकरबरोबर लग्न केलं होतं. यात त्यांनी आपला भाऊ लक्ष्मी मित्तल यांची मुलगी वनिशाच्या लग्नापेक्षा ५ कोटी पौंड (सुमारे ४८५ कोटी रुपये) जास्त खर्च केले होते.
पत्नीच्या जीवावर जगतोय
मित्तल म्हणाले, आता माझे कोणतेही उत्पन्न नाही. माझी पत्नी आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी आहे. आमची बँक खाती वेगळी आहेत आणि मला तिच्या उत्पन्नाविषयी मर्यादित माहिती आहे. माझा दरमहा सुमारे २ हजार ते ३ हजार पौंड खर्च मुख्यतः माझी पत्नी आणि कुटुंबीय करत आहेत. माझ्या दिवाळखोरी प्रक्रियेचा कायदेशीर खर्च देखील दुसरेच उचलत आहेत.
ही वेळ का आली?
मित्तल उत्तर बोस्नियामधील मेटलर्जिकल कोक प्रॉडक्ट्स कंपनी ग्लोबल इस्पात कोकसाना इंडस्ट्रीजा लुकावाक (जीआयकिल) चे सह-मालक होते आणि त्यांच्या निरिक्षक मंडळाचे प्रमुख होते. परंतु या कंपनीच्या कर्जासाठी त्यांनी वैयक्तिक हमी दिली होती यातूनच त्यांचे वाईट दिवस सुरू झाले. २०१३ कंपनी सुमारे १६.६ कोटी डॉलर्सचे कर्ज फेडण्यास अपयशी ठरली. प्रमोद मित्तल यांना गेल्या वर्षी कंपनीच्या अन्य दोन अधिकाऱ्यांसह अटक करण्यात आली होती. भारतातही सार्वजनिक कंपनी स्टेट ट्रेडिंग कॉर्पोरेशन (एसटीसी) कडे सुमारे २,२०० कोटींचे कथित मनी लॉन्ड्रिंगचं प्रकरण सुरु आहे.