नवी दिल्ली-
केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार आल्यानंतर सरकारी माध्यमांचेही दिवस बदलू लागले. 'मन की बात' या कार्यक्रमाद्वारे ऑल इंडिया रेडिओला म्हणजेच 'आकाशवाणी'ला लाखो नवीन श्रोते मिळाले. त्याच वेळी लोकसभा आणि राज्यसभा टीव्ही यांचे विलीनीकरण करून संसद टीव्हीची स्थापना करण्यात आली. एवढंच नाही तर सरकारनं शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र चॅनेल डीडी किसान सुरू केलं. यामुळे प्रसार भारतीची कमाई वाढली असून आता प्रसार भारतीने डीडी फ्री डिशमधूनच १००० कोटींहून अधिक कमाई केली आहे.
प्रसार भारतीच्या DD फ्री डिश प्लॅटफॉर्मने ६५ स्लॉट्सच्या लिलावातून विक्रमी १०७० कोटी रुपयांची कमाई केली आहे. गेल्या वर्षी ५९ स्लॉटच्या विक्रीतून मिळालेल्या उत्पन्नापेक्षा हे उत्पन्न ५७ टक्के अधिक आहे. गेल्या वर्षी हे उत्पन्न ६४५ कोटी रुपये होते.
मोदी सरकारची रणनीती कामी आली
मोदी सरकारच्या कार्यकाळात स्लॉट लिलावाचे नियम आणि पद्धती बदलल्यामुळे प्रसार भारतीचे उत्पन्न वाढण्यास मदत झाल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. सार्वजनिक क्षेत्रातील प्रसारक प्रसार भारतीने आता वेगवेगळ्या शैलीतील चॅनेलना त्या स्लॉट्ससाठी बोली लावण्याची परवानगी दिली आहे जे आधी केवळ विशिष्ट जॉनरसाठी निश्चित केले गेले होते. पूर्वीच्या चॅनेलना फक्त त्यांच्याच जॉनरमधील स्लॉटसाठी बोली लावण्याची परवानगी होती. डीडी फ्री डिशचे स्लॉट ६ बकेटच्या अंतर्गत विकले जातात.
डीडी फ्री डिश स्लॉटचं बकेट
डीडी फ्री डिशमध्ये ६ बकेट स्लॉट आहेत. यापैकी A+ हे हिंदी भाषेतील सामान्य मनोरंजन चॅनेलसाठी आहे. A मध्ये हिंदी भाषेतील चित्रपट चॅनेल आणि टेलिशॉपिंग चॅनेल समाविष्ट आहेत. बी बकेटमध्ये हिंदीमध्ये संगीत, खेळ आणि भोजपुरी चॅनेल समाविष्ट आहेत. सी बकेट हिंदी वृत्तवाहिन्यांसाठी आहे. दुसरीकडे, डी बकेटमध्ये इतर हिंदी, प्रादेशिक, धार्मिक आणि इंग्रजी वृत्तवाहिन्यांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त, R1 श्रेणीमध्ये प्रादेशिक चॅनेल आहेत जे इतर कोणत्याही बकेटमध्ये येत नाहीत.
कोणत्या बकेटची किती कमाई?
DD फ्री डिशने A+ श्रेणी स्लॉटमधून १८९.६५ कोटी, A मधून ३२९.५५ कोटी, B मधून २०६.५ कोटी, C मधून १९९ कोटी, D मधून १४१.८५ कोटी आणि R1 मधून ३.०५ कोटी कमावले आहेत.