मुंबई - वित्तमंत्री निर्मला सीतारामन 2020-21 या वर्षासाठीचा देशाचा अर्थसंकल्प आज संसदेत सादर करणार आहेत. मात्र देशावर असलेले मंदीचे सावट आणि बाजारातील सुस्ती यामुळे अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी शेअर बाजारामध्ये चिंतेचे वातावरण दिसून येत आहे. त्यामुळे आज बाजार सुरू झाल्यानंतर सेंसेक्समध्ये सुरुवातीलाच मोठी घसरण झाली होती. दरम्यान, सध्या सेंसेक्स 140 अंकांनी घसरला असून, निफ्टीमध्येही 126.50 अंकांची घसरण झाली आहे.
आज अर्थसंकल्प सादर होणार असल्याने शनिवार असूनही शेअर बाजार सुरू आहे. दरम्यान, आज बाजार उघडल्यानंतर शेअर बाजारात खरेदीदारांमध्ये फारसा उत्साह दिसून आला नाही. परिणामी सेंसेक्स 140 तर निफ्टी 126.50 अंकांनी घसरला.
दरम्यान, आगामी वर्षाचा केंद्रीय अर्थसंकल्प मांडण्यापूर्वी वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी सन २०१९-२० या वित्तीय वर्षाचा आढावा घेणारा आर्थिक सर्वेक्षण अहवाल शुक्रवारी संसदेत सादर केला होता. सध्या विकासदर गेल्या १० वर्षांतील सर्वात निचांकी पातळीवर म्हणजे ४.५ टक्क्यांवर आला असून, मार्चअखेर तो किंचित सुधारून पाच टक्क्यांवर पोहोचण्याची अपेक्षा आहे. देशातील बेरोजगारीचे प्रमाणही गेल्या ४५ वर्षांत सर्वात जास्त आहे. या पार्श्वभूमीवर अर्थव्यवस्थेस पुन्हा उभारी देण्यासाठी सरकारने काय करायला हवे याची एक प्रकारे दिशा या अहवालात दाखविण्यात आली आहे.