लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: लोकांसह राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा लक्षात घेऊन स्मार्टफोनमधील पूर्वस्थापित (प्री-इन्स्टॉल्ड) ॲपही फोनमधून हटविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याचा विचार केंद्र सरकारने चालविला आहे. त्यासाठी नियमात बदल केला जाणार आहे.
प्रस्तावित नियमानुसार कंपन्यांना स्मार्टफोनमध्ये आधीच स्थापित असलेले ॲप काढून टाकण्याचा पर्याय उपलब्ध करून द्यावा लागेल. सरकारच्या या निर्णयामुळे सॅमसंग, शाओमी, विवो आणि ॲपल यांसारख्या कंपन्यांवर परिणाम होईल. नव्या फोनच्या लाँचिंगवर याचा परिणाम होऊ शकतो.
काय आहे सुरक्षेचा मुद्दा?
- एका वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्याने सांगितले की, पूर्वस्थापित ॲप सुरक्षेच्या दृष्टीने कमजोर सिद्ध होऊ शकतात. त्यांचा हेरगिरीसाठी उपयोग केला जाऊ शकतो. त्यामुळे विदेशी शक्ती त्याचा फायदा घेऊ शकतात.
- याबाबतीत चिनी मोबाइल अधिक धोकादायक ठरू शकतात. सैनिकांच्या परिवारांनी चिनी मोबाइल वापरू नयेत, असा सल्ला गुप्तचर संस्थांनी अलीकडेच दिला आहे.
- चीनच्या ३०० ॲप्सवर भारताने बंदी घातली आहे. इतरही अनेक देशांनी चिनी ॲप्सवर कारवाई केली आहे. हुवावेसारख्या काही चिनी कंपन्यांवर अमेरिकेसह अनेक देशांनी बंदीही घातली आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"