नवी दिल्ली : महागाई वाढण्यासह सिमेंट, लोखंड, वीट आणि स्टीलसह इतर वस्तूंच्या किमती वाढल्याने देशभरात घराच्या किमती नऊ टक्क्यांपर्यंत वाढल्या आहेत. असे असतानाही एप्रिल ते जून या तिमाहीत वार्षिक आधारावर घरांच्या विक्रीत ४.५ टक्क्यांनी वाढ झाली आहे, तर तिमाही आधारावर यात पाच टक्क्यांनी वाढ झाली आहे.
संपत्ती सल्लागार संस्था ‘प्रॉपटायगर’च्या एका अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. अहवालानुसार, वाढती महागाई आणि वाढता खर्च याचा बांधकाम क्षेत्राच्या विक्रीवर किंवा नवीन प्रकल्प येण्यावर कोणताही परिणाम झालेला नाही.
देशातील प्रमुख ८ शहरांमध्ये जून तिमाहीमध्ये ७४,३३० घरांची विक्री झाली, तर गेल्या वर्षी याच काळात केवळ १५,९६८ घरांची विक्री झाली होती. तर मार्च तिमाहीमध्ये घरांची विक्री ७०,६२३ इतकी होती.
कुठे कुठे झाली विक्रीत मोठी वाढ?
तिमाहीत अहमदाबाद शहरात घरांची विक्री या वर्षाच्या जून तिमाहीमध्ये वाढून ७,२४० इतकी झाली आहे. आदल्या वर्षी हा आकडा १,२८० होता. बंगळुरूत ८,३५० घरांची विक्री झाली. आदल्या वर्षी १,५९० घरे विकली गेली होती. चेन्नईतील घर विक्री मागच्या वर्षीच्या ७१० वरून ३,२२० झाली.
गेल्या वर्षी या कालावधीत कोरोना साथीची दुसरी लाट आलेली होती. त्यामुळे मागणीवर परिणाम झालेला होता. मात्र, आता कोरोनाचे संकट दूर झाले असून, अर्थव्यवस्था सावरत असल्याने बाजारात सुधारणा झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
- ७.२-९% दरम्यान गृहकर्जाचा दर
- ०५% वाढली मार्च तिमाहीच्या तुलनेत जून तिमाहीत घरांची विक्री
१०% दिल्ली एनसीआरमध्ये घरांच्या विक्रीत घट झाली.
कुठे किती वाढली विक्री आणि किंमत?
मुंबई-दिल्लीत काय स्थिती?
दिल्ली-एनसीआरमधील घर विक्री जून तिमाहीमध्ये मार्च तिमाहीच्या तुलनेत १० टक्के कमी राहिली, तर वार्षिक आधारावर ६०%नी वाढली आहे.
ही विक्री २,८३० वरून ४,५२० वर गेली. कोलकात्यातील घर विक्री १,२५० वरून ३,२२० वर गेली.
मुंबईतील घरविक्री ३,३८० वरून २६,१५० वर गेली. पुण्यातील घर विक्री २,५०० वरून १३,७२० वर गेली आहे.