नवी दिल्ली : गेल्या वर्षभरात व्याजदर २.५ टक्क्यांनी वाढल्यानंतरही देशात पर्सनल लाेन अर्थात वैयक्तिक कर्जाची मागणी वाढली आहे. गेल्या आर्थिक वर्षात लाेकांनी या कर्जाला पसंती दिली. त्यासाेबतच कृषी कर्जातही वाढ झाली आहे. तर लाेकांनी घेतलेल्या एकूण कर्जाचे प्रमाण १५ टक्क्यांनी वाढले आहे.
‘केअरएज’ या रेटिंग संस्थेने देशातील कर्जासंदर्भात अहवाल सादर केला आहे. त्यानुसार, चालू आर्थिक वर्षात बॅंकांमधील ठेवींच्या तुलनेत कर्जाची मागणी जास्त राहू शकते. तसेच वैयक्तिक कर्जाला यावर्षीही सर्वाधिक मागणी राहील. बॅंकांच्या एकूण कर्जापैकी ३२ टक्क्यांपेक्षा जास्त वाटा वैयक्तिक कर्जाचा आहे.
असुरक्षित कर्जवाटपात सर्वाधिक वाढ
गेल्या आर्थिक वर्षात वैयक्तिक कर्जाचे प्रमाण २०.६ टक्क्यांनी वाढून १.७ लाख काेटी रुपयांपर्यंत झाले आहे. गृह कर्ज १५ टक्क्यांनी वाढले आहे. इतर काेणतही कर्जाच्या तुलनेत असुरक्षित कर्ज सर्वाधिक वाढले आहे.