नवी दिल्ली : जागतिक चॅम्पियन पी. व्ही. सिंधू व जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या चीनी तैपैच्या ताइ ज्यू यिंंग या दोघींना प्रीमियर बॅडमिंटन लिगच्या लिलावादरम्यान मंगळवारी ७७ लाखांची बोली लागली. सिंधूला हैदराबाद हंंटर्सने आपल्याकडे ठेवले, तर यिंगलला बंगलूरु रॅपटर्सने खरेदी केले.भारताच्या आघाडीच्या खेळाडूंमधील बी साईप्रणितला रॅपटर्सने ३२ लाख रुपये खर्च करुन आपल्याकडे ठेवले. चेन्नई सुपरस्टार्सने पुरुष एकेरीतील बी. सुमीत रेड्डी याला ११ लाख रुपयांना तर पुणे एसेसने चिराग शेट्टी याला १५ लाख ५० हजार रुपयांना आपल्याकडे ठेवले.जागतिक क्रमवारीतील नवव्या क्रमांकावर असणारी अमेरिकेची बेइवान झेंग हिला अवध वॉरियर्सकडेच राहणार असून संघाने तिच्यासाठी ३९ लाख रुपये मोजले आहेत. राष्टÑीय बॅडमिंटन प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांची मुलगी गायत्री गोपिचंद हिला चेन्नईने खरेदी केले.आसामची तरुण खेळाडू अश्मिता चालिहाला नॉर्थ इस्टर्न वॉरियर्सने आपल्याकडे ३ लाख रुपये खर्च करुन ठेवले. साई प्रणित ,लक्ष्य सेन व सात्विकसाई राज रंकीरेड्डी व चिराग शेट्टी यांच्यासह १५४ खेळाडू लिलावासाठी उपलब्ध होते. पीबीएलचे पुढील सत्र २० जानेवारी ते ९ फेबु्रवारी पर्यंत होणार असून यात ७४ भारतीय खेळाडू सहभाग घतील.बंगलोर, चेन्नई, हैदराबाद व लखनौ येथे होणाऱ्या २१ दिवसीय स्पर्धेत अवध वॉरियर्स (लखनौ), बंगलूरु रेपटर्स (बंगलोर), मुंबई रॉकेट्स (मुंबई), हैदराबाद हंटर्स (हैदराबाद), चेन्नई सुपरस्टार्स (चेन्नई), नॉर्थ इस्टर्न वॉरियर्स (पूर्वोत्तर) व पुणे ७ एसेस (पुणे) हे संघ सहभागी होतील.
प्रीमियर बॅडमिंटन लीग : सिंधू, ताइ ज्यू सर्वात महाग खेळाडू
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2019 3:32 AM