-सी. ए. उमेश शर्मा
अर्जुन (काल्पनिक पात्र) : कृष्णा, दिवाळीचा सण जवळ आला आहे. घराघरांत गृहलक्ष्मी साफसफाई करून गृहसजावटीत मग्न झाल्या आहेत. व्यापारीसुद्धा बाजारपेठेत व्यस्त आहेत. दिवाळीच्या साफसफाईनिमित्त जुन्या हिशोबाच्या पुस्तकांची (अकाउंटस् बुक्स) सांभाळणी विक्रीकर व आयकर कायद्यांतर्गत कशी करावी?
कृष्ण (काल्पनिक पात्र) : अर्जुना, दिवाळीनिमित्ताने जुन्या वस्तूंचा त्याग व नवीन वस्तूंचे स्वागत करायला हवे. ज्या वस्तूमध्ये स्वच्छता असते तेथे लक्ष्मीचे वास्तव्य जास्त वेळ राहते. हे बघ अर्जुना, व्यापारात अनेक करविषयी कायदे लागू होतात. प्रत्येक कायद्यात हिशोबाची पुस्तके कशी व किती वर्षे सांभाळावी याच्या तरतुदी आहेत.
अर्जुन : कृष्णा, व्यापाऱ्यास व्हॅट कायद्याअंतर्गत कशी व किती वर्षे जमा-खर्चाच्या वह्या सांभाळाव्या लागतात?
कृष्ण : अर्जुना, व्हॅट कायद्याच्या नियमानुसार व्यापाऱ्याने जमा-खर्चाच्या सर्व वह्या, रोकडवही, खतावणी, स्टॉक रजिस्टर्स, बँक खाते, खरेदी व विक्रीची बिले, माल वाहतुकीच्या पावत्या इत्यादी ज्या आर्थिक वर्षाशी संबंधित आहेत ते वर्ष संपल्यापासून ८ वर्षांपर्यंत सांभाळून ठेवणे गरजेचे आहे. उदा. चालू वर्ष २०१६ - १७च्या हिशोबाची पुस्तके सन २०२४ - २०२५पर्यंत सांभाळणे आवश्यक आहे. तसेच कोणत्याही वर्षासाठी अपील प्रकरण वा कायदेशीर कारवाई सुरू असल्यास ते संपेपर्यंत हिशोबांची पुस्तके सांभाळून ठेवणे जरुरी आहे. या दिवाळीत वर्ष २००७ - २००८पर्यंतच्या पुस्तकांची विल्हेवाट लावता येईल.
अर्जुन : हिशोबाची पुस्तके ठेवण्यासाठी आयकर कायद्याअंतर्गत काय तरतूद आहे?
कृष्ण : आयकर कायद्याअंतर्गतसुद्धा पुस्तके उदा : रोकडवही, खतावणी, खरेदी व विक्रीची बिले, बँक खाते इत्यादी ८ वर्षे सांभाळावी लागतात. तसेच विशिष्ट व्यवसाय करणारे उदा : डॉक्टर, वकील इ. यांना हिशोबाची पुस्तके ठेवणे आवश्यक आहे. तसेच इतर कोणत्याही व्यक्तीची वा व्यापाऱ्यांची वार्षिक उलाढाल रुपये १० लाखांपेक्षा जास्त किंवा वार्षिक उत्पन्न रुपये १ लाख २० हजारांपेक्षा जास्त मागील कोणत्याही ३ वर्षांत असेल तर त्यांनाही हिशोबाची पुस्तके ठेवणे गरजेचे आहे. तसेच आयकर कायद्या अंतर्गत अंदाजित उत्पन्न दाखविणाऱ्यांना आयकर कलम ४४ ए.डी.मध्ये उलाढालीच्या ८ टक्के प्रमाणे किंवा ४४ ए.ई. वाहतूक व्यवसाय करणाऱ्यांना हिशोबाची पुस्तके ठेवण्याची गरज नाही. ज्यांना हिशोब ठेवणे जरुरी आहे अशा व्यावसायिक व व्यापारी करदात्यांनी हिशोबाची पुस्तके ठेवली नाही, तर आयकर खाते त्यांना रुपये २५ हजारांचा दंड लावू शकते. तसेच बरोबर पुस्तके न ठेवल्यास कर आकारणीत अंदाजित उत्पन्न धरून कर लावले जाऊ शकतात.
अर्जुन : कृष्णा, आजकाल कॉम्प्युटर, सॉफ्टवेअरमध्येच हिशोब ठेवला जातो, मग त्याचे काय?
कृष्णा : हिशोब जरी कॉम्प्युटर सॉफ्टवेअरमध्ये ठेवला असला तरी त्याचे प्रिंटआऊट सांभाळून ठेवणे गरजेचे आहे. आयकर कायद्यानुसार कॉम्प्युटरवर ठेवलेला डाटा, अथवा पेन - ड्राईव्ह, सीडी इत्यादी उपकरणांवर साठवून ठेवलेली माहितीसुद्धा पुस्तकांच्या परिभाषेत मोडते. अधिकारी त्या उपकरणांची तपासणी करू शकतात. पूर्वी हस्तलिखित वहीखात्यामध्ये सहसा बदल करणे शक्य होत नव्हते, ते आता कॉम्प्युटरमुळे शक्य होते. त्यासाठी दक्षता व सावधानता पाळली पाहिजे.
अर्जुन : कृष्णा, पुस्तकांचे महत्त्व या दिवाळीच्या सणात काय आहे?
कृष्ण : अर्जुना, दिवाळीत धनतेरसला धनाजी पूजा केली जाते. लक्ष्मीपूजनात नवीन पुस्तकांचे (चोपडी)सुद्धा पूजन केले जाते. आर्थिक कायद्यात नवीन वर्ष १ एप्रिल ते ३१ मार्च असे आहे व त्यानुसार हिशोब-पुस्तके ठेवली जातात, तसेच भारतीय संस्कृती अनुसार नवीन वर्षाचे दीपावली पाडव्यापासून म्हणजे विक्रम संवत २०७२ची सुरुवात होते.
अर्जुन : कृष्णा, आजकाल पैसा (लक्ष्मी) कमविण्यासाठी मनुष्य अहोरात्र धडपड का करीत आहे?
कृष्ण : अर्जुना, लक्ष्मी फार चंचल आहे. तिचा सांभाळ करण्यासाठी व्यवहारात सुस्पष्ट विचार, चांगले आचरण, प्रामाणिकता असणे आवश्यक आहे. स्पर्धेच्या युगात मनुष्य अधिक संपत्ती कमविण्यासाठी धडपड करीत आहे व समाधान हरवून बसला आहे. हे लक्षात ठेव की, चांगल्या मार्गाने कमविलेला पैसा चांगलेच फळ देतो, दुष्कर्माने कमविलेला पैसा अधोगतीस नेतो. परंतु याचे भान ‘कलीयुगात’ मनुष्य विसरून गेला आहे. मनुष्य अगोदर पैसा कमविण्यासाठी आरोग्य गमवितो, त्यानंतर म्हातारपणी आरोग्य कमविण्यासाठी पैसा गमवितो, दिवाळीचा मंत्र म्हणजेच ‘शुभंम् करोती कल्याणमं्, आरोग्यम् धनसंपदा’ यातील ‘आरोग्यम् धनसंपदा’च्या अनुसंगे, मनुष्याने आपले व परिवाराचे आरोग्य सांभाळूनच उचित धनसंपादन करावे.
दीपावलीनिमित्त कायद्याच्या जाचक अटींचा काळोख दूर होवो व करदात्याचे जीवन प्रकाशमान व्होवो. सर्व भक्तांना दीपावलीच्या शुभेच्छा!
दिवाळीनिमित्त अकाउंट बुक्सचे जतन आणि पूजन
दिवाळीनिमित्ताने जुन्या वस्तूंचा त्याग व नवीन वस्तूंचे स्वागत करायला हवे.
By admin | Published: October 17, 2016 05:15 AM2016-10-17T05:15:20+5:302016-10-17T05:58:25+5:30