नवी दिल्ली : बँक आॅफ बडोद्यातून संशयास्पदरीत्या १६00 कोटी रुपये परदेशात पाठविल्या जाण्याच्या पार्श्वभूमीवर यापुढे गैरमार्गाने विदेशी चलन हस्तांतरणावर चाप बसविण्यासाठी एकाच खात्यातून होणाऱ्या अनेक छोट्या व्यवहारांबाबत सतर्क राहण्याची नोटीस जारी करा, तसेच आपल्या ग्राहकांशी संबंधित (केवायसी) नियमावलीची कडक अंमलबजावणी करा, असे आवाहन केंद्रीय दक्षता आयुक्तांनी (सीव्हीसी) भारतीय रिझर्व्ह बँक इंडियन बँक असोसिएशनला केले आहे.समजा एखाद्या खात्यातून एक लाख डॉलरपेक्षाही कमी रक्कम परदेशात पाठविली जात असेल, तर ती ध्यानात आली पाहिजे, असे पत्र आम्ही रिझर्व्ह बँकेला लिहिले आहे, असे दक्षता आयुक्त टी.एम. भसीन यांनी पत्रकारांना सांगितले. ते म्हणाले की, असेच पत्र आम्ही इंडियन बँक असोसिएशनला लिहिले आहे. एखाद्या खात्यातून एक लाख डॉलरपेक्षाही कमी रक्कम अनेक वेळा परदेशात पाठविली जात असेल तर त्याकडे लक्ष देऊन सावध झाले पाहिजे, असे आम्ही त्या पत्रात लिहिले आहे. सध्याच्या प्रचलित नियमानुसार एक लाख डॉलरपेक्षा जास्त रक्कम पाठविली जात असेल तरच दक्षतेचा इशारा देण्यात येतो. बँक आॅफ बडोद्यात झालेल्या घोटाळ्यासारखे घोटाळे पुन्हा होऊ नयेत म्हणून सर्वच बँकांनी केवायसी आणि मनी लाँडरिंग विरोधी मार्गदर्शक तत्त्वांची कडक अंमलबजावणी करायला हवी, असेही त्यांनी स्पष्ट केले.काही दिवसांपूर्वीच दिल्लीतील बँक आॅफ बडोद्याच्या एका शाखेतून ६,१00 कोटी रुपये गैरमार्गाने हाँगकाँगला धाडण्यात आले होते. या प्रकरणाची सीबीआय आणि ईडी दोघेही तपास करीत आहेत. हे प्रकरण उघड होताच सीव्हीसीने सीबीआय आणि ईडीला तपास करण्याची व्यक्तिश: विनंती केली होती. सीव्हीसीचे पत्र मिळाल्यानंतर लगेचच सीबीआयने दिल्लीतील अशोकविहारस्थित सीव्हीसीच्या शाखेवर छापा मारला होता. त्यानंतर ५९ ठिकाणी छापे मारण्यात आले होते. या प्रकरणात बँकेचा तोटा झाला नसला तरीही व्यवहारासाठी बँकेचा वापर करण्यात आला होता.
विदेशात जाणाऱ्या छोट्या रकमांचेही व्यवहार रोखा
By admin | Published: October 24, 2015 4:32 AM