Join us

इतिहासात पहिल्यांदाच घडलं! सोने-चांदीचे भाव सारखेच; दोघेही ४९,३०० रुपयांवर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2020 2:48 AM

अनलॉक - १ मध्ये सुवर्णपेढ्या सुरू झाल्यानंतर चांदी ५० हजार रुपये प्रति किलो तर सोने ४७ हजार ३०० रुपये प्रति तोळा असे भाव होते.

विजयकुमार सैतवाल 

जळगाव : गेल्या अनेक दिवसांपासून एकमेकांपेक्षा कमी जास्त भाव होत असलेले सोने-चांदीचे दर शनिवार प्रथमच एकसारखे ४९ हजार ३०० रुपयांवर पोहचले. म्हणजे एक किलो चांदीच्या भावात एक तोळा सोने! सोन्यामध्ये ४०० रुपयांनी वाढ होऊन ते ४९ हजार ३०० रुपये प्रति तोळा तर चांदीत ६०० रुपयांनी घसरण होऊन ती ४९ हजार ३०० रुपये प्रति किलोवर आली.

गेल्या काही दिवसांपासून भारत-चीन तणावामुळे सोने-चांदीचे भाव वाढतच आहे. अनलॉक - १ मध्ये सुवर्णपेढ्या सुरू झाल्यानंतर चांदी ५० हजार रुपये प्रति किलो तर सोने ४७ हजार ३०० रुपये प्रति तोळा असे भाव होते. त्यानंतर या दोघांच्या भावात चढ-उतार होत राहिला व १५ जून रोजी सोने ४७ हजार ८०० रुपये प्रति तोळा तर चांदी ४८ हजार रुपये प्रति किलोवर येऊन दोघांच्या भावामध्ये केवळ २०० रुपयांचा फरक होता. २६ रोजी सोन्याचे भाव ४८ हजार ९०० तर चांदीचे भाव ४९ हजार ९०० रुपयांवर आले होते. मागणी कायम असल्याने शनिवारी सोन्यात ४०० रुपयांनी वाढ होऊन ते ४९ हजार ३०० रुपये प्रतितोळ््यावर पोहचले. दुसरीकडे चांदीत ६०० रुपयांची घसरण होऊन तीदेखील ४९ हजार ३०० रुपये प्रतिकिलोवर आली.सोने-चांदीच्या भावात नेहमी फरक असतो. मात्र आता प्रथमच दोन्ही धातूंचे भाव एक सारखे झाले आहे. - स्वरुप लुंकड, सचिव, जळगाव शहर सराफ असोसिएशन, जळगाव.

टॅग्स :सोनंचांदी