Join us

पुन्हा दरवाढ ! सीएनजी अन् पीएनजीच्या दरात मोठी वाढ, प्रवास महागला

By ऑनलाइन लोकमत | Published: August 03, 2022 8:22 AM

पेट्रोल डिझेलनं शंभरी गाठल्यानंतर अनेकांनी आपला मोर्चा सीएनजी गाड्यांकडे वळवला होता

मुंबई - वार्षिक आधारावर सीएनजीच्या दरात ७४ टक्के वाढ झाल्यामुळे मे महिन्यात सीएनजीवर चालणाऱ्या कारच्या विक्रीत ११.५८ टक्के घसरण झाल्याचं पाहायला मिळालं. देशात इंधन दरवाढीसोबतच सीएनजी गॅसमध्येही वाढ होत आहे. आता पुन्हा एकदा सीएनजीच्या किंमतीत मुंबईत मोठी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे, मुंबईकरांसाठी ही खिशाला चटका देणारी बातमी आहे. सीएनजीच्या किमतीत किलोमागे 6 रुपये तर पीएनजीच्या किंमतीत 4 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. 

पेट्रोल डिझेलनं शंभरी गाठल्यानंतर अनेकांनी आपला मोर्चा सीएनजी गाड्यांकडे वळवला होता. तुलनेनं स्वस्त असल्यामुळे लोक सीएनजी गाड्यांना प्राधान्य देत होते. परंतु, पेट्रोल डिझेल पाठोपाठ सीएनजीदेखील शंभरी गाठण्याच्या उंबरठ्यावर पोहचत आहे. कारण, आता पुन्हा एकदा मुंबईत सीएनजी आणि पीएनजी गॅसच्या दरात वाढ झाली आहे. सीएनजीच्या किमतीत प्रति किलो 6 रुपये आणि पीएनजीच्या किमतीत 4 रुपये प्रति एससीएम वाढ करण्यात आली आहे. अगोदरच महागाईचे चटक सहन करणाऱ्या सर्वसामान्य जनतेच्या खिशाला आणखी भार सोसावा लागणार आहे. या नवीन वाढीमुळे मुंबईत किमती वाढल्यानंतर आता सीएनजी 86 रुपये प्रति किलो आणि पीएनजी गॅस 52 रुपये 50 पैसे प्रति एससीएम दराने उपलब्ध होणार आहे. 

इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेडने मे महिन्यात सीएनजीच्या किमतीत दोन रुपयांनी वाढ केली होती. गेलने सिटी गॅस कंपन्यांना पुरवल्या जाणाऱ्या नैसर्गिक वायूच्या किमती वाढवल्या असून त्याचा बोजा सर्वसामान्य मुंबईकरांवर पडणार आहे. ग्रीन गॅस लिमिटेडनं सोमवारी लखनौमध्ये सीएनजीच्या किंमतीत ५.३ रूपये प्रति किलोची वाढ केली. लखनौमध्ये ग्रीन गॅस लिमिटेडद्वारे पुरवठा केला जात असून आता त्या ठिकाणी सीएनजी ९६.१० रूपये प्रति किलो वर पोहोचला. या क्षेत्रातील तज्ज्ञांनुसार गेल द्वारे करण्यात आलेल्या या दरवाढीनंततर कंपन्या ही दरवाढ ग्राहकांच्या खिशावर टाकू शकतात अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

गाड्यांची विक्री घटली

दरम्यान, सीएनजी महागल्यामुळे चारचाकी गाड्यांची विक्री घटल्याचे जाणकारांनी सांगितले. गत या कालावधीत पेट्रोलवर चालणाऱ्या वाहनांची विक्री मात्र १२.८८ लाखांवरून वाढून १३.५६ लाखांवर गेली. मार्चपासून आतापर्यंत सीएनजीचा दर १८ ते २० रुपयांनी महागला आहे. या काळातील पेट्रोल-डिझेलची दरवाढ मात्र नाममात्र राहिली आहे. 

टॅग्स :पेट्रोलकारडिझेलमुंबई