नवी दिल्ली, दि. 11 : पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत रोज दरबदल होत आहे. यामुळे वाहनचालकांना मनस्तापाचा सामना करावा लागत आहे. त्यातच पेट्रोल-डिझेल जीएसटीतून वगळण्यात आल्याने, त्यावरील व्हॅट कायम आहे. गेल्या तीन महिन्यामध्ये पेट्रोल जवळपास सात रुपयांनी महागले आहे.जुलैपासून पेट्रोलच्या दरात 6.94 रुपयांची वाढ झाली आहे, तर डिझेलचे दर 4.73 रुपयांनी वाढले आहेत. पेट्रोलचे दर सध्या तीन वर्षांच्या उच्चांकावर आहेत. याचा जास्त तोटा मुंबई आणि दिल्ली या दोन शहराला बसला आहे. पेट्रोलसाठी सर्वात जास्त किंमत या दोन शहरामध्ये मोजली जाते.
सार्वजनिक क्षेत्रातील पेट्रोलियम कंपनींच्या आकडेवारीनुसार, जुलैच्या सुरुवातीपासून डिझेलच्या दरात 3.67 रुपयांची वाढ झाली आहे. सध्या दिल्लीत डिझेलचे दर 58.62 रुपये लीटर म्हणजेच चार महिन्यांच्या उच्चांकावर आहेत. 16 जून रोजी दिल्लीत पेट्रोलचे दर 65.06 रुपये लीटर होते. त्यानंतर फक्त चार दिवस वगळता दररोज पेट्रोलच्या दरात वाढ झाली आहे. या चार दिवसांत पेट्रोलचे दर 2 ते 9 रुपयांनी कमी झाले होते. डिझेलचे दर 16 जून रोजी 54.49 रुपये लीटर होते, तर 2 जुलै रोजी 53.36 रुपये लीटर होते. त्यानंतर डिझेलच्या दरात वाढ होत आहे.
सध्या दिल्लीत पेट्रोल दर 70.30 रुपये तर मुंबईमध्ये प्रति. लिटर 79.41 रुपये मोजावे लागतात. ऑगस्ट 2014 च्या दुस-या पंधरवड्यानंतरचे हे सर्वाधिक दर आहेत. 15 वर्षांची परंपरा मोडत पेट्रोलियम कंपन्या 16 जूनपासून पेट्रोलचे दर रोजच्या रोज निश्चित करत आहेत.
यापूर्वी प्रत्येक 15 दिवसाला पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत चढउतार होत होता. पण जूननंतर यामध्ये बदल करत किंमतीत दररोज बदल होत आहे. कधीकाळी एक -दोन रुपये जरी पेट्रोल वाढले, तरी वाहनचालकांच्या असंतोषाला कंठ फुटायचा. आता तर तीन महिन्यात पेट्रोलने 7 रुपयांची उसळी घेतली आहे. तरीही सगळे चिडीचूप आहेत. त्यामागे रोजच्या रोज बदलणारे पेट्रोलचे दर कारणीभूत आहेत.
तूमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलच्या किंमती पाहण्यासाठी इथं क्लिक करा -