लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : गेल्या काही दिवसांपासून सुवर्ण बाजारात असलेल्या अस्थिरतेचा परिणाम अजूनही कायम असून, मंगळवारी (दि.२२) एकाच दिवसात चांदीच्या दरात सहा हजार रुपये तर सोन्याच्या दरात ६०० रुपयांनी घसरण झाली. त्यामुळे चांदी ६८ हजार रुपयांवरून थेट ६२ हजार रुपये प्रतिकिलोवर, तर सोने ५१ हजार ९०० रुपयांवरून ५१ हजार ३०० रुपये प्रति तोळ्यावर आले.
कोरोनामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत अस्थिरता निर्माण झाली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठ्या प्रमाणावर घडामोडी घडत आहेत. जागतिक अर्थव्यवस्थेवर त्याचा थेट परिणाम होत आहे. अशा प्रकारच्या परिस्थितीत भारतासह अमेरिका, रशिया, चीन अशा देशातील बडे गुंतवणूकदार कोणत्याही प्रकारची जोखीम नको म्हणून ‘एक्सचेंज ट्रेडेड फंड’ (इटीएफ)मध्ये मोठ्या प्रमाणावर सोने आणि चांदी खरेदी करत आहेत. त्यामुळे आपल्याकडे सोने आणि चांदीचे दर अस्थिर आहेत. तरीही सोन्याने पन्नास हजाराचा टप्पा गाठलेला आहे.
आंतरराष्टÑीय बाजारात सध्या खूप अस्थिरता आहे. अशा परिस्थितीत मंगळवारी गुंतवणूकदारांनी सोने-चांदीची विक्री सुरू केली. त्यामुळे सोने-चांदीचे दर घसरले.
- स्वरूप लुंकड
सचिव, जळगाव शहर सराफ बाजार असोसिएशन