Elon Musk Starlink: जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क यांची सॅटेलाइट इंटरनेट सेवा कंपनी स्टारलिंक (Starlink) भारतात आगमनासाठी सज्ज झाली आहे. या कंपनीमुळे देशातील मोबाईल नेटवर्क क्षेत्रातील २ मोठे खेळाडू धास्तावले आहेत. येत्या काळात मुकेश अंबानींची कंपनी रिलायन्स जिओ आणि सुनील भारती मित्तल यांची कंपनी भारती एअरटेलसमोर स्टारलिंकचे मोठे आव्हान असणार आहे. मात्र, तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार सध्या मस्कच्या कंपनीकडून या २ भारतीय कंपन्यांना कोणताही धोका नाही.
इकॉनॉमिक टाईम्सच्या वृत्तानुसार, उद्योग तज्ञांनी म्हटले आहे की जरी स्टारलिंकने भारतीय बाजारपेठेत प्रवेश केला तरी रिलायन्स जिओ आणि भारती एअरटेलसाठी त्वरित धोका निर्माण होणार नाही. कारण या भारतीय कंपन्यांच्या तुलनेत स्टारलिंकचे इंटरनेट खूप महाग असू शकतो. तज्ञांच्या मते, स्टारलिंकचे जागतिक सरासरी मासिक दर या २ भारतीय कंपन्यांच्या ब्रॉडबँडपेक्षा ४ पटीने महाग आहेत.
स्टारलिंक इंटरनेसाठी किती पैसे मोजावे लागणार?
रिलायन्स जिओ आणि एअरटेलचे सरासरी मासिक दर १० ते १३ डॉलर्स (सुमारे ८४२ ते १०९६ रुपये) आहेत. जर आपण स्टारलिंकबद्दल बोललो तर, त्याचे सरासरी मासिक दर ४० ते ५० डॉलर्स (सुमारे ३३७३ ते ४२१७ रुपये) आहे. अशा परिस्थितीत स्टारलिंकची किंमत जिओ आणि एअरटेलच्या ब्रॉडबँडपेक्षा ४ पट जास्त आहे.
स्पेक्ट्रमवरुन युद्ध
सध्या देशात आणि जगातील अनेक कंपन्यांमध्ये सॅटेलाइट ब्रॉडबँडबाबत युद्ध सुरू आहे. देशात सॅटेलाइट ब्रॉडबँड सेवेसाठी वाटप प्रक्रियेवर सरकार भर देत असताना मुकेश अंबानी आणि सुनील मित्तल लिलाव प्रक्रियेवर भर देत आहेत. मात्र, लिलाव नव्हे तर स्पेक्ट्रमचे वाटप होणार असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.
या संघर्षात, रिलायन्स जिओ आणि भारती एअरटेल व्यतिरिक्त, स्टारलिंक आणि जेफ बेझोस यांच्या नेतृत्वाखालील अमेझॉन कुईपर सारख्या जागतिक सॅटेलाईट कंपन्यांमध्ये आधीच युद्ध सुरू आहे. स्टारलिंक आणि जेफ बेझोस यांच्या नेतृत्वाखालील अमेझॉन कुईपर सारख्या जागतिक सॅटेलाईट कंपन्या भारतात प्रवेश करण्यास उताविळ झाल्या आहेत.
स्पर्धा वाढणार
स्टारलिंक आणि अमेझॉन कुइपरच्या आगमनाने ब्रॉडबँड क्षेत्रात मोठी स्पर्धा पाहायला मिळणार आहे. तज्ज्ञांच्या मते, रिलायन्स जिओ आणि भारती एअरटेलला टक्कर देण्यासाठी या २ विदेशी कंपन्या त्यांच्या सेवांची किंमत कमी ठेवू शकतात. अशा परिस्थितीत रिलायन्स जिओ आणि भारती एअरटेलवर देखील किंमत कमी करण्यासाठी दबाव येईल. यात ग्राहकांना होण्याची शक्यता आहे.