अभिनेत्री नर्गिस दत्त या करियरमध्ये उत्तुंगस्थानी होत्या. त्या वेळी त्यांनी मरिन ड्राईव्ह इथे केलेल्या घरखरेदीला माध्यमांत ठळक प्रसिद्धी मिळाली होती. कारण त्या वेळी देखील मरिन ड्राईव्ह हा उच्चभ्रूंचाच परिसर म्हणून ओळखला जात होता. त्यानंतरच्या पिढीला मात्र मरिन ड्राईव्ह गाठता आले नाही. पुढची पिढी वरळीकडे सरकली. दमदार आवाज अन् अभिनयामुळे वेगळी ओळख राखणाऱ्या राजकुमार यांनी वरळी सी-फेसला बंगला खरेदी केला आणि पुन्हा त्याची बातमी झाली. त्यानंतर मात्र वरळी देखील महागल्याने सिनेमाची मंडळी पुढे वांद्र्याकडे सरकली.
पाली हिल हा त्या काळापासून जणू सिनेकलाकारांचा अड्डाच झाला. राज कपूर, गुरुदत्त, दिलीप कुमार, राजेश खन्ना, राजेंद्र कुमार, नासीर हुसेन, गुलजार, सुनील दत्त अशा कित्येकांना आपल्या गृहस्वप्नाची पूर्तता तेथे करता आली. पण काळ पुढे सरकला आणि अमिताभ बच्चन यांचा उदय झाला. मात्र, उमेदीच्या काळात अमिताभ यांनादेखील वांद्र्याचा विचार करता आला नाही आणि ते पुढे जुहूला सरकले आणि मग जुहू हा सिने-कलाकारांच्या निवासस्थानाचा नवा पत्ता तयार झाला.
कालौघात मुंबईतील दर वाढत गेले आणि आता थेट मढमध्ये सिने-कलाकारांनी मोठ्या प्रमाणावर घरखरेदी केली आहे. इथे मुद्दा असा की, जे कलाकार नव्याने इंडस्ट्रीत स्थिरावू पाहत आहेत, त्यांना आता मढ किंवा तत्मस परिसराशिवाय पर्याय नाही. याचे स्वाभाविक कारण म्हणजे वाढलेले दर. पण जे कलाकार काही दशके मुंबईत स्थिरावले आहेत आणि ज्यांची आलिशान घरे झालेली आहेत, ते कलाकार आता नव्या गुंतवणुकीसाठी मुंबईतच रिअल इस्टेटला प्राधान्याने पसंती देत आहे.
अशा स्थिरावलेल्या कलाकारांसोबत त्यांची पुढची पिढी जी देखील अभिनय क्षेत्रात सक्रिय आहे, त्यांच्या देखील अजेंड्यावर प्राधान्याने रिअल इस्टेटच असल्याचे दिसून येते. चालू वर्षात पहिल्या दहा महिन्यांत बॉलिवूडमधील या कलाकारांनी मुंबईत घर व कार्यालये मिळून तब्बल ३७३ कोटी ६४ लाख रुपयांची गुंतवणूक करत आपले मुंबईवरील प्रेम अधोरेखित केले आहे.
मुंबईतच गुंतवणुकीला प्राधान्य का? असा प्रश्न निर्माण होतो. तर याचे उत्तर म्हणजे, मुंबईच्या मालमत्ता किमतीचे एक वैशिष्ट्य आहे इथल्या किमती कधीही कमी झालेल्या नाहीत. त्यांचा आलेख कायमच चढता राहिलेला आहे. कोरोनापूर्वी मुंबई व उपनगरातील मालमत्तांच्या किमतीमध्ये प्रत्येक वर्षी सरासरी १० ते १५ टक्क्यांनी वाढ नोंदली गेली होती. कोरोनानंतर २०२२ पासून पुन्हा एकदा मुंबईतील मालमत्तांच्या किमतीमध्ये पुन्हा अशाच पद्धतीच्या दरवाढीचा ट्रेंड सुरू झाला आहे. त्यामुळे आत्ता हातात असलेले पैसे रिअल इस्टेटमध्ये गुंतवण्याकडे या मंडळींचा कल आहे.