Join us

लॉकडाऊनमध्ये आधार ठरलेल्या 'पारले-जी'ला महागाईची झळ; कंपनीनं वाढवले बिस्किटाचे दर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2021 10:48 AM

पारले कंपनीनं वाढवले पारले-जी बिस्किटांचे दर; कच्च्या मालाच्या किमती वाढल्यानं दर वाढ

मुंबई: सर्वात स्वस्त बिस्किट अशी ओळख असलेल्या पारले जीच्या किमतीत वाढ झाली आहे. कच्च्या मालाचे दर वाढल्यानं बिस्किटांच्या किमती वाढवत असल्याची माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे. पारलेजी बिस्किटाचे दर ५ ते १० टक्क्यांनी वाढवण्यात आली आहे.

पारले जीच्या उत्पादनासाठी आवश्यक असलेल्या कच्च्या मालाच्या किमतींमध्ये मोठी वाढ झाली असल्याचं कंपनीनं सांगितलं. बिस्किटांचे दर वाढू नयेत यासाठी आमचे प्रयत्न सुरू होते. मात्र कच्च्या मालाच्या वाढलेल्या किमती लक्षात घेता बिस्किटांचे दर वाढवण्याशिवाय कोणताही पर्याय शिल्लक राहिला नाही, अशी माहिती कंपनीचे सीनियर कॅटेगरी हेड मयंक शाह यांनी सांगितलं. बिस्किटांच्या निर्मितीसाठी गहू, साखर, खाद्यतेलाची आवश्यकता असते.

खाद्यतेलाचे दर सध्या प्रति लिटर २०० रुपयांच्या पुढे गेले आहेत. गेल्या वर्षभरात तेलाचे दर ५० टक्क्यांनी वाढले आहेत. साखरचा दर किलोमागे ४० रुपये आहे. तर एक किलो गहू ४० ते ५० रुपयांना उपलब्ध आहे. ग्लुकोज बिस्किटाच्या किमतीत ६ ते ७ टक्क्यांनी वाढ करण्यात आल्याची माहिती कंपनीनं दिली. तर रस्क आणि केकसारख्या बिस्किटांच्या किमतीत ५ ते १० टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे.

हाईड अँड सीक आणि क्रॅकजॅक पारले कंपनीचे प्रसिद्ध ब्रँड आहेत. त्यांच्या किमतीही वाढवण्यात आल्या आहेत. ज्या बिस्किटांच्या किमती २० रुपयांहून अधिक आहेत, त्यांच्या किमतींमध्ये वाढ करण्यात आल्याची माहिती मयंक शहा यांनी दिली. कच्च्या मालाच्या किमती वाढल्याचा परिणाम सगळ्याच कंपन्यांना सहन करावा लागत असल्याचं शहा यांनी सांगितलं.

टॅग्स :पार्ले-जी