Prime Minister Internship Scheme 2024 : पंतप्रधान इंटर्नशिप योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख १५ नोव्हेंबर २०२४ पर्यंत वाढवण्यात आली आहे. तरुण उमेदवारांना विविध क्षेत्रात इंटर्नशिपच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत, 24 विविध क्षेत्रांमध्ये तब्बल ८०,००० इंटर्नशिपच्या संधी युवकांना उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. तुम्ही अजूनही यासाठी अर्ज केला नसेल तर याची सर्व माहिती जाणून घ्या.
कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयद्वारे (MCA) पंतप्रधान इंटर्नशिप योजना चालवली जात आहे. या अंतर्गत, तरुणांना उद्योगांमध्ये काम करण्याचा महत्त्वपूर्ण अनुभव मिळतो, जो त्यांच्या करिअरसाठी फायदेशीर ठरू शकतो. या योजनेत अर्ज करण्यासाठी कुठलेही शुल्क भरावे लागत नाहीत. यासाठी pminternship.mca.gov.in या सरकारी पोर्टलद्वारे अर्ज करता येतो.
इंटर्नशिपचे फायदे आणि लाभ
या योजनेंतर्गत, निवडलेल्या इंटर्नला दरमहा ५,००० रुपये भत्ता दिला जातो. यापैकी ५०० रुपये इंटर्नशिप प्रदान करणारी कंपनी तिच्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) फंडातून देतात, तर ४,५०० रुपये सरकारचे योगदान आहे. या भत्त्यामुळे तरुणांना त्यांच्या अनुभवावर लक्ष केंद्रित करण्यास मदत होईल. या काळात त्यांचा आर्थिक भारही कमी होईल.
योजनेसाठी पात्रता
पंतप्रधान इंटर्नशिप योजना २०२४ अंतर्गत अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी खालील पात्रता निकष पूर्ण केले पाहिजेत:
वयोमर्यादा : उमेदवाराचे वय २१ ते २४ वर्षांच्या दरम्यान असावे.
शैक्षणिक पात्रता : हायस्कूल किंवा उच्च माध्यमिक (12वी), ITI, डिप्लोमा, किंवा कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी (BA, BSc, BCom, BCA, BBA, B Pharma).
अर्ज करण्यास पात्र क्षेत्र : योजनेंतर्गत २४ विविध क्षेत्रांमध्ये इंटर्नशिपच्या संधी उपलब्ध आहेत. यात महिंद्रा अँड महिंद्रा, टाटा ग्रुप आणि एल अँड टी सारख्या आघाडीच्या कंपन्यांचा समावेश आहे.
अर्ज करण्याची प्रक्रिया
इच्छुक उमेदवारांनी पंतप्रधान इंटर्नशिप योजनेसाठी अधिकृत वेबसाईट pminternship.mca.gov.in वर जावे लागेल. अर्ज प्रक्रिया पूर्णपणे विनामूल्य असून उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. सर्व अर्जदारांना अपडेटसाठी नियमितपणे वेबसाइट तपासण्याचा सल्ला दिला जातो. या योजनेशी संबंधित अधिक माहितीसाठी, उमेदवारांना संबंधित पोर्टल, ईमेल आणि फोनद्वारे माहिती दिली जाते.