नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निर्मला सीतारमन यांनी आज संसदेमध्ये केंद्रातील मोदी सरकारचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पामध्ये अनेक महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत. त्याबरोबरच वित्तमंत्री निर्मला सीतारमन यांनी अर्थसंकल्पामधून चार जातींच्या विकासावर सर्वाधिक लक्ष केंद्रित करण्यात आल्याचे सांगितले.
केंद्र सरकारच्या या अर्थसंकल्पावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हा अंतरिम अर्थसंकल्प सर्वसमावेशक आणि नाविन्यपूर्ण आहे. हा अर्थसंकल्प विकसित भारताच्या युवा, गरीब, महिला आणि शेतकरी या ४ स्तंभांना सक्षम करेल, असं नरेंद्र मोदींनी सांगितले. तसेच हा अर्थसंकल्प २०४७ पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याची हमी देतो, असंही नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे. या अर्थसंकल्पात तरुण भारताच्या युवा आकांक्षांचे प्रतिबिंब असल्याची प्रतिक्रिया देखील नरेंद्र मोदींनी दिली.
अर्थसंकल्पात दोन महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. संशोधन आणि नाविन्यपूर्णतेसाठी १ लाख कोटी रुपयांचा निधी जाहीर करण्यात आला आहे. या अर्थसंकल्पात, वित्तीय तूट नियंत्रणात ठेवत, भांडवली खर्चाला ११, ११, १११ कोटी रुपयांचा ऐतिहासिक उच्चांक देण्यात आला आहे. अर्थतज्ञांच्या भाषेत बोलायचे झाले तर हे 'स्वीट स्पॉट' आहे. यासह, भारताच्या २१व्या शतकातील आधुनिक पायाभूत सुविधा निर्माण करण्याबरोबरच, तरुणांसाठी असंख्य नवीन रोजगार संधी तयार होतील, असं नरेंद्र मोदींनी सांगितले.
दरम्यान, गरीब, महिला, तरुण आणि शेतकरी यांच्या विकासाचा उल्लेख करताना वित्तमंत्री निर्मला सीतारमन यांनी सांगितले की, सर्वांसाठी घर, प्रत्येक घरामध्ये पाणी आणि सर्वांसाठी वीज उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला आहे. ८० कोटी लोकांसाठी मोफत धान्याचीही व्यवस्था करण्यात आली आहे. त्याशिवाय शेतकऱ्यांसाठी एमएसपी वाढवण्यात आली आहे. तसेच ग्रामीण अर्थव्यवस्थेवर विशेष भर देण्यात आला आहे. सर्व पात्र लोकांना सरकारी योजनांचा लाभ देण्यावर भर देण्यात आला आहे. त्यांच्या सर्वांगीण आणि सर्वसमावेशक विकासावर काम सुरू आहे. आम्ही गरीबांसाठी खूप काम करत आहोत. या १० वर्षांमध्ये सरकारने २५ कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढण्यात यश आले असल्याची माहिती निर्मला सीतारमन यांनी दिली.