नवी दिल्ली : अप्रत्यक्ष करातून जमा होणारा महसूल उद्दिष्टापेक्षा खूपच कमी असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता यात स्वत: लक्ष घालायचे ठरविले आहे. या जमा होणाऱ्या महसुलावर ते लक्ष ठेवणार आहेत.अर्थसंकल्पात अप्रत्यक्ष करातून जमा होणाऱ्या महसुलाचे उद्दिष्ट २५.८ टक्के ठरविण्यात आले असून, एप्रिल ते डिसेंबर या कालावधीत फक्त ६.७ टक्के एवढाच महसूल जमा झाला आहे. अर्थसंकल्पीय उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न व्हायला हवेत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अपेक्षित आहे. ते स्वत: यावर लक्ष ठेवून आहेत, असे केंद्रीय अबकारी आणि सीमाशुल्क मंडळाचे अध्यक्ष कौशल श्रीवास्तव यांनी अप्रत्यक्ष कर विभागाच्या सर्व मुख्य आयुक्तांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.अप्रत्यक्ष करात सीमाशुल्क, अबकारी कर आणि सेवाशुल्काचा समावेश होतो. अर्थसंकल्पीय उद्दिष्ट गाठणे हे एक मोठे आव्हान आहे, असे श्रीवास्तव यांनी म्हटले आहे. विविध विभागांना आपण भेटी दिल्या असून, महसूल सचिवांशीही चर्चा केली आहे, असे श्रीवास्तव यांनी म्हटले असून, आपण स्वत:ही सातत्याने जमा होणाऱ्या महसुलाचा आढावा घेत आहोत असे स्पष्ट केले.(लोकमत न्यूज नेटवर्क)
पंतप्रधान स्वत: ठेवणार अप्रत्यक्ष करवसुलीवर लक्ष
By admin | Published: February 12, 2015 12:35 AM