Yes Bank Q2 Result : खासगी क्षेत्रातील बँक येस बँकेचे आता अच्छे दिन परतताना दिसत आहेत. चालू आर्थिक वर्षाच्या ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत येस बँकेचा निव्वळ नफा तिपटीनं वाढून ६१२ कोटी रुपये झालाय. खासगी क्षेत्रातील बँकेला गेल्या वर्षी याच कालावधीत २३१ कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला होता. वार्षिक आधारावर कंपनीच्या निव्वळ नफ्यात १६५ टक्क्यांची वाढ झाली आहे.
येस बँकेचा शेअर शुक्रवारी १.२४ टक्क्यांनी घसरून १८.२५ रुपयांवर होता. गेल्या सहा महिन्यांत येस बँकेचा शेअर २६ टक्क्यांनी घसरलाय.
९ हजार कोटींहून अधिक उत्पन्न
चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत कंपनीचं एकूण उत्पन्न वाढून ९,३४१ कोटी रुपयांवर पोहोचलंय, जे मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत ८,१७९ कोटी रुपये होतं, असे येस बँकेने शनिवारी शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत म्हटलंय. आलोच्य तिमाहीत बँकेचं व्याज उत्पन्न वाढून ७,८२९ कोटी रुपयांवर पोहोचलंय, जे मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत ६,९८४ कोटी रुपये होते.
एनआयआयमध्ये १० टक्के
खासगी क्षेत्रातील बँकेचे निव्वळ व्याज उत्पन्न (एनआयआय) डिसेंबर तिमाहीत १० टक्क्यांनी वाढून २,२२४ कोटी रुपयांवर पोहोचलं आहे, जे मागील आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत २,०१७ कोटी रुपये होतं. बँकेचं निव्वळ व्याज मार्जिन (एनआयएम) २.४ टक्क्यांवर स्थिर राहिलं. डिसेंबर तिमाहीत ऑपरेटिंग नफा वाढून १,०७९ कोटी रुपये झाला आहे, जो गेल्या वर्षी याच कालावधीत ८६४ कोटी रुपये होता.
एनपीएमध्ये सुधारणा
मालमत्तेच्या गुणवत्तेच्या बाबतीत डिसेंबर तिमाहीअखेर बँकेचे एनपीए प्रमाण सुधारून १.६ टक्क्यांवर पोहोचलंय आहे. त्याचप्रमाणे निव्वळ एनपीए किंवा बुडीत कर्जाचं प्रमाण गेल्या आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीअखेर ०.९ टक्क्यांवरून ०.५ टक्क्यांवर आलंय.
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)