मुंबई : ‘आॅल इंडिया बँक आॅफिसर्स असोसिएशन’ (एआयबीओए) या सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमधील अधिकाऱ्यांच्या संघटनेने खासगी क्षेत्रातील बँकांमधील अधिकाऱ्यांसाठी स्वतंत्र शाखा सुरू केली असून या शाखेच्या माध्यमातून खासगी बँकांचे अधिकारीही येत्या २ सप्टेंबरच्या नियोजित देशव्यापी बँक संपात सहभागी होणार आहेत.
‘एआयबीओए’ने सोमवारी एका प्रसिद्धीपत्रकात ही माहिती देताना सांगितले की, ‘प्रायव्हेट सेक्टर बँक आॅफिसर्स फोरम’ची स्थापना रविवारी बंगळुरू येथे करण्यात आली. कोटक महिंद्र बँकेचे महेंद्र बाबू हे या नव्या फोरमचे अध्यक्ष असतील.
गेल्या १५ वर्षांत देशात दोन टप्प्यांत खासगी बँका सुरू होऊन त्या आज मोठ्या आणि स्थिरस्थावर झाल्या असल्या तरी यापैकी बहुतांश बँकांमध्ये कोणतीही कामगार संघटना कार्यरत नव्हती. ही उणीव लक्षात घेऊन हा नवा फोरम स्थापन करण्यात आला आहे.
अलीकडेच आयएनजी वैश्य बँकेचे कोटक महिंद्र बँकेत विलीनीकरण झाले तेव्हा वैश्य बँकेत कर्मचारी संघटना असल्याने त्यांनी यास विरोध केला होता. ‘एआयबीओए’च्या म्हणण्यानुसार खासगी बँकांमध्येही कायम जागांवर कंत्राटी नेमणुका, रिक्त झालेल्या कायम जागा भरल्या न जाणे, बँकिंगशी संबंधित कामे बाहेरून करून घेणे, ‘परफॉर्मन्स लिंक्ड बोनस’ देताना पक्षपात करणे असे कर्मचाऱ्यांशी निगडित अनेक प्रश्न आहेत. नवा फोरम त्यांचा पाठपुरावा करेल. (प्रतिनिधी)
२ सप्टेंबरच्या संपात खासगी बँकांचे कर्मचारीही सहभागी
‘आॅल इंडिया बँक आॅफिसर्स असोसिएशन’ (एआयबीओए) या सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमधील अधिकाऱ्यांच्या संघटनेने खासगी क्षेत्रातील बँकांमधील अधिकाऱ्यांसाठी स्वतंत्र शाखा सुरू
By admin | Published: August 17, 2015 11:17 PM2015-08-17T23:17:12+5:302015-08-17T23:17:12+5:30