गुरगाव (हरियाणा) : सार्वजनिक आणि विदेशी गुंतवणूक मोठ्या प्रमाणात होत आहे. तथापि, अर्थव्यवस्थेच्या चौफेर वाढीसाठी खासगी क्षेत्राने मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी शनिवारी येथे केले. घरगुती गुंतवणुकीचे आव्हान कायम असल्याचे निरीक्षण नोंदविताना जेटलींनी आर्थिक वाढीला उत्तेजन देण्यासाठी उद्योग जगताला पाठिंबा देण्याचे आवाहन बँकिग क्षेत्राला केले.भारतीय खासगी क्षेत्र मोठ्या प्रमाणात विस्तारण्याची गरज आहे. त्यासाठी गुंतवणुकीची आवश्यकता असून, गुंतवणूक झाली तरच अर्थव्यवस्था चौफेर प्रगती करील, असे जेटली म्हणाले. ते येथे आयोजित कर्ज वसुलीवरील परिसंवादात बोलत होते. जेटलींनी यावेळी देशातील प्रत्यक्ष थेट गुंतवणुकीच्या उदारीकरणाचाही उल्लेख केला. अरुण जेटली म्हणाले की, उदारीकरणामुळेच भारत आज परदेशी गुंतवणूकदारांसाठी सर्वात पसंतीचे ठिकाण बनला आहे. परदेशी गुंतवणूकदारांना येथे त्यांच्या गुंतवणुकीवर कोणत्याही अन्य देशाच्या तुलनेत अधिक लाभ मिळत आहे. सार्वजनिक गुंतवणूक आणि परदेशी भांडवल यांचे प्रवाह अबाधित आहेत. तथापि, घरगुती गुंतवणुकीचे आव्हान कायम आहे. सणासुदीच्या काळात झालेल्या व होत असलेल्या खरेदीमुळे आशेचा किरण डोकावत असून, शहरी भागातच नव्हे, तर ग्रामीण भागांमध्येही तेजीचे संकेत आहेत. (वृत्तसंस्था)
खासगी क्षेत्राने गुंतवणूक करावी
By admin | Published: November 06, 2016 1:06 AM