नवी दिल्ली : खासगीकरण ही दीर्घ प्रक्रिया आहे, तसेच ज्या बँका अथवा सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या आपण विक्रीला ठेवू त्या विक्रीच्या दृष्टीने आकर्षकही (सेलेबल) असल्या पाहिजेत, असे प्रतिपादन वित्त राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी केले आहे.
एका मुलाखतीत ठाकूर यांनी सांगितले की, एक खरेदीदार म्हणून तुम्ही केवळ आजारी बँकाच पाहाल का? विक्रेते म्हणूनही आपल्याला सावध राहावे लागते. संपुआ सरकारच्या पहिल्या पाच वर्षांतील कामगिरीकडे पाहा. या पाच वर्षांत त्यांना केवळ ८,४९९ कोटी रुपयेच निर्गुंतवणुकीतून उभारता आले. याचाच अर्थ ते अपयशी ठरले होते.
त्या पुढच्या पाच वर्षांत मात्र त्यांनी जवळपास एक लाख कोटी रुपये उभारले. रालोआ सरकारने तीन लाख कोटी रुपयांच्या आसपास निधी उभा करण्यात यश मिळविले. हे महत्त्वाचे आहे. ही दीर्घ प्रक्रिया आहे. तिला वेळ लागतो. तुम्ही जे काही विक्रीला ठेवता ते विक्रीयोग्य असले पाहिजे. जाणकार सूत्रांनी सांगितले की, ठाकूर यांचे वक्तव्य सूचक असून, सरकार नफ्यातील बँकांचेही खासगीकरण करू शकते, असे संकेत त्यातून मिळत आहेत.