-सी. ए. उमेश शर्मा
अर्जुन (काल्पनिक पात्र) : कृष्णा, भर दिवाळीत २० आॅक्टोबरला जीएसटीआर ३बी रिटर्न आणि कर भरावयाची तारीख आल्याने खूपच अडचण झाली. त्यातल्या त्यात ही लेट फीसचाही टाइम बॉम्ब अडचणीचा ठरला आहे.
कृष्ण (काल्पनिक पात्र) : अर्जुना, दिवाळी सण उत्सवाचा सण म्हणून साजरा केला जातो. लक्ष्मीपूजन करून व्यापारात भरभराट होवो, अशी इच्छा व्यापारी व्यक्त करतो, परंतु या उत्सवात जीएसटीच्या रिटर्न्सच्या तारखेने अडचण निर्माण केली व आॅगस्टच्या रिटर्नची लेट फीससुद्धा याला कारणीभूत आहे.
अर्जुन : कृष्णा, जीएसटी रिटर्न वेळेवर न भरल्यास किती लेट फीस लागते?
कृष्ण : अर्जुना, जीएसटीमध्ये १०० रुपये प्रति दिवस आणि सीजीएसटी आणि एसजीएसटी या दोन्हीसाठी एकूण २०० रु. रोज अशी लेट फीस भरावी लागते. उदा. सप्टेंबर २०१७चा जीएसटीआर ३बी २० आॅक्टोबरला भरायचे गरजेचे होते. जर २ दिवस लेट भरले गेले, तर २
गुणिले २०० = ४०० रुपये भरावे लागेल.
अर्जुन : कृष्णा, ही लेट फीस कशी भरावी लागेल?
कृष्ण : अर्जुना, लेट फीस रिटर्न भरण्याआधी वेगळी भरावी लागते. ती आयटीसीच्या विरुद्ध वापरता येत नाही. याचा अर्थ, बँक किंवा कॅश पेमेंटनेच हे भरावे लागते, तसेच कर आणि व्याज हे वेगळेच भरावे लागतात.
अर्जुन : कृष्णा, लेट फीस कोणत्या महिन्याची माफ करण्यात आली होती ?
कृष्ण : अर्जुना, जुलै महिन्याची लेट फीस माफ करण्यात आली
होती, असे सरकार म्हणते. नंतर
आॅगस्ट आणि सप्टेंबरची वसूल करण्यात येत आहे. जेव्हा जीएसटी लागू करण्यात आले होते, तेव्हा ६ महिने जाचक तरतुदींची अंमलबजावणी आम्ही करणार नाही, असे आश्वासन सरकारने दिले होते. जीएसटीएन नेटवर्कमध्येही खूप वेळोवेळी बदल करण्यात आले. त्यामुळे आॅगस्ट व सप्टेंबरची लेट फीससुद्धा या सणासुदीच्या काळात माफ करण्यात यावी, अशी करदात्यांची इच्छा आहे.
अर्जुन : कृष्णा, कोणत्या गोंधळामुळे लेट फीस भरावी लागेल?
कृष्ण : अर्जुना, खरे म्हणालास, जीएसटी कायदा अजूनही सुरुवातीच्या टप्प्यातच आहे. इनमीन तीन ते चार महिनेच झाले आहेत. प्रत्येक स्तरावर सरकार, अधिकारी, करसल्लागार, व्यापारी इत्यादीसुद्धा जीएसटीची चाचपडत अंमलबजावणी करत आहे. करदाता प्रचंड त्रास झेलून जीएसटीचे रिटर्न्स भरत आहे. त्यामुळे शासनाने कर भरण्यास उशीर झाल्यास, व्याज जरूर वसूल करावे, परंतु तांत्रिक अडचणीमुळे रिटर्नला उशीर झाल्यास, या सुरुवातीच्या काळात लेट फीस वसूल करणे हे चुकीचे आहे. आशा करू या यातून दिलासा मिळावा.
अर्जुन : कृष्णा, करदात्याने यातून काय बोध घ्यावा ?
कृष्ण : अर्जुना, अंदाजे जुलैचे रिटर्न ५६ लाख, आॅगस्टचे ५० लाख, सप्टेंबरचे ४० लाख, करदात्यांनीच रिटर्न भरले आहे. एकूण ८० लाख जीएसटीत करदाते आहेत, असे म्हटले जाते. २०० रुपये रोजीने करोडो रुपयांची लेट फी शासनाला यातून मिळणार आहे. प्रामाणिक करदात्यास त्रास होऊ नये. दिवाळीत फटाक्यातला रॉकेट एखाद्याच्या मागे लागल्यास कशी तारंबळ उडते, तशी या रिटर्न आणि लेट फीसमुळे तारांबळ उडाली आहे करदात्याची. लेट म्हणजेच टाइम बॉम्बसारखेच झाले आहे, वेळेवर रिटर्न न भरल्यास ते फुटतीलच. शासनाने महसूल जरूर गोळा करावा, परंतु करदात्यास त्रास देऊन लेट फीस गोळा करू नये.
जीएसटी रिटर्नच्या लेट फीसचा टाइम बॉम्ब ठरला अडचणीचा
कृष्णा, भर दिवाळीत २० आॅक्टोबरला जीएसटीआर ३बी रिटर्न आणि कर भरावयाची तारीख आल्याने खूपच अडचण झाली. त्यातल्या त्यात ही लेट फीसचाही टाइम बॉम्ब अडचणीचा ठरला आहे.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2017 11:31 PM2017-10-22T23:31:31+5:302017-10-22T23:31:40+5:30