बुलढाणा : मोहम्मद पैगंबर यांचा जन्मदिवस ईद मिलादून्नबी दुसऱ्या दिवशी २९ सप्टेंबरला ठिकठिकाणी साजरी करण्यात आली. मेहकर, जानेफळ येथे २९ सप्टेंबर रोजी मिरवणूक काढण्यात आली. ईद मिलादून्नबीनिमित्त जिल्ह्यात रक्तदान शिबीरातून सामाजिक संदेश देण्यात आला.
जानेफळ : मोहम्मद पैगंबर यांचा जन्मदिवस ईद मिलादून्नबी जानेफळ येथे शुक्रवार २९ सप्टेंबर रोजी साजरी करण्यात आली. या निमित्त गावातून मिरवणूक काढण्यात आली. स्थानिक मुस्लिम बांधव यात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. जामा मस्जिद पासून मिरवणुकीस सुरुवात झाली. गावातून मिरवणूक आल्यानंतर मस्जिद मध्ये फातेहाखानी झाली. यावेळी नजाकत हुसेन यांनी मोहम्मद पैगंबर यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला. मोहम्मद पैगंबर यांनी दिलेल्या शिकवणीचे पालन करण्याबाबत मार्गदर्शन केले. त्यानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
लोणार येथे ईद-ए-मिलादुन्नबीमिनिमित्त मिरवणूक
लोणार : प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांचा जन्मदिवस साजरा करण्यात आला. यानिमित्त शहरात मिरवणूक काढण्यात आली. यात हजारो मुस्लिम बांधवांनी सहभाग घेतला होता. जमीयते उलमाए हिद सामाजिक संघटनेकडून रक्तदान शिबिर घेण्यात आले.
ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त सजवलेल्या गाड्या, हिरव्या पताका, शुभेच्छा फलक घेऊन आबालवृद्धांसह शहरातील विविध परिसरातील मुस्लिम बांधव मिरवणुकीत सहभागी होते. पारंपरिक वेशात सहभागी मुस्लिम बांधवांनी शिस्तबद्ध मिरवणूक काढली. या वेळी ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जीवनावर माहिती देण्यात आली. स्थनिक जामा मशीद चौक येथून मिरवणुकीला सुरुवात झाली. येथून मुख्य मार्गाने पोलिस स्टेशन, साबणपुरा येथून कब्रस्तान येथील ईदगाह येथे मौलाना अल्हाज मोहम्मद रफीऊद्दीन अशरफी साहब किबला, परभणी व शहरातील सर्व मजीद मधील मौलाना यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर मिरवणुकीचा समारोप करण्यात आला.
रक्तदान हेच श्रेष्ठ दानचा दिला संदेश
हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जन्मदिनानिमित्त लोणार शहरात जमीयते उलमाए हिद सामाजिक संघटनेकडून रक्तदान शिबिर आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील सर्व मान्यवरांच्या वतीने उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. युवकांनी रक्तदान हेच श्रेष्ठ दानचा संदेश या शिबिरातून दिला.